
सामना प्रतिनिधी । मुंबई
दिवाळी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय. फराळ बनविण्यासाठी लागणाऱया डाळी, रवा-मैद्यापासून ते कपडे, आकाशकंदिलापर्यंत सर्वच गोष्टी 15 ते 20 टक्क्यांनी महागल्याने सर्वसामान्यांचे पुरते दिवाळे निघण्याची वेळ आली आहे. आधीच महिन्याच्या शेवटी हाती काही शिल्लक राहत नाही. त्यातच महागाईमुळे दिवाळी सण साजरा करायचा कसा, असा प्रश्न मध्यमवर्गीयांना पडला आहे. सण साजरा तर होणार पण घरोघरी महागाईचे कंदील लागणार हे नक्कीच.
प्लॅस्टिकबंदीमुळे बाजारात सगळीकडे कागद आणि कापडापासून तयार केलेले कंदील आले आहेत. ग्राहकही इको फ्रेंडली कंदिलांची मागणी करताना दिसत आहेत. यंदा क्रेझ आहे ती कापडापासून तयार केलेल्या आणि बारीक नक्षीकाम असलेल्या राजस्थानी कंदिलांना. 400 रुपयांपासून हे कंदील उपलब्ध आहेत. चायना मेड कंदिलांऐवजी पारंपरिक आकाशकंदील खरेदी करण्याकडेच ग्राहकांचा ओढा आहे. आइसकॅण्डी, स्टार, आकाशदीप, एलईडी कंदीलदेखील ग्राहकांचे लक्ष वेधून घेत आहेत.
पेट्रोलपासून घरगुती गॅसपर्यंत झालेल्या दरवाढीत आमच्यासारखा सर्वसामान्य होरपळतोय. ऐन दिवाळीत खरेदीसाठी होणारी गर्दी आणि महागाई टाळण्यासाठी आम्ही आधीच खरेदी करणे पसंत केले. किराणा मालापासून ते कंदिलांपर्यंत प्रत्येक गोष्टीत किमान 20 टक्के दरवाढ जाणवतेय. डाळींचे आणि तेलाचे भाव तर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे खर्च करताना हात थोडा आखडताच घ्यावा लागतोय.
– सूर्यकांत जाधव, ग्राहक
दिवाळी हा वर्षातला सर्वात मोठा सण आहे. महागाईचे कारण देत सणाकडे पाठ फिरवून कसे चालेल? तेल, डाळी महागल्या असल्या तरी दिवाळीचा फराळ तयार करावाच लागणार आहे. महागाईमुळे सर्वसामान्यांमध्ये म्हणावा तसा उत्साह राहिला नाही हेदेखील तितकेच खरे.
– निकीशा टोंपे, ग्राहक
तेल, डालडा शंभरीपार!
दिवाळीचे फराळ तयार करताना त्यात सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तेल आणि डालडा. घाऊक बाजारात साखर आणि डाळींच्या तुलनेत महागाईचा सर्वाधिक फटका बसला आहे तो तेल आणि डालडय़ाला. गतवर्षीच्या तुलनेत डालडा 90 रुपयांवरून 110 रुपयांवर पोहोचला आहे, तर खाद्यतेलही प्रतिलिटर 15 ते 20 रुपयांनी महागले आहे. सनफ्लॉवर तेलाच्या पिशवीसाठी 140 रुपये मोजावे लागत आहेत. या पिशवीचे दर गतवर्षी 110 रुपये होते.
रेडिमेड फराळाला महागाईची फोडणी
रेडिमेड फराळालाही यंदा महागाईचा फटका बसला आहे. किलोमागे किमान 20 ते 30 रुपयांची वाढ झाली आहे. चकली 400 रुपये किलो आहे. तर चिवडा, शेव, शंकरपाळीने 300 रुपये किलोचा टप्पा गाठला आहे. डाएट चिवडय़ाच्या 200 ग्रॅम पॅकसाठी 50 रुपये तर रवा, बेसन लाडू आणि करंजीच्या एका नगासाठी 22 ते 25 रुपये मोजावे लागत आहेत.
किराणा मालाचे दर
वस्तू -किंमत(प्रतिकिलो रु.)
साखर- 40
चणाडाळ-76
जाडी चणाडाळ- 80
जाड रवा -36
बारीक रवा -36
पिठीसाखर -48
मैदा -36
पातळ पोहे- 64
जाड पोहे -60
बदाम -880
काजू -1080































































