
नागपूरच्या मध्यवर्ती कारागृहात कैद्यांना गांजा पुरवण्यासाठी कारागृह कर्मचाऱ्यांनीच रॅकेट सुरू केल्याचे वृत्त समोर आले आहे. गुन्हे शाखेने रॅकेट उधळून लावले असून दोन कारागृह कर्मचाऱ्यांसह पाच जणांवर गुन्हाही दाखल करण्यात आला होता. ‘व्हॉट्सॲप’वरून मागणीनुसार गांजा, ड्रग्स, मोबाईल, कोल्ड्रिंक्स, खर्रा, सिगारेट अशा वस्तू पुरवण्यात येत होत्या. यामधील अन्य आरोपींनाही लवकरच अटक करण्यात येणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिली आहे.
अजिंक्य राठोड आणि प्रशांत राठोड कारागृह कर्मचाऱ्यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
गेल्या महिन्यांत पोलिसांनी मध्यवर्ती कारागृहात छापा घातला होता. मात्र त्यावेळी राबवण्यात आलेल्या ‘सर्च ऑपरेशन’वेळी या छाप्याची कारागृह अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना माहिती मिळाल्यामुळे काहीही आढळून आले नाही. कारागृहात कैद्यांना गांजा, दारू, मोबाईल, सीमकार्ड आणि अन्य वस्तू पुरवणारी टोळी तयार झाली होती.
कैद्यांना प्रत्येक वस्तूसाठी वेगळे दर आकारण्यात आले होते. 10 ग्रॅम गांजासाठी 5 हजार रुपये तर 100 रुपये प्रतिमिनिट कॉल तसेच सिगारेट आणि खाण्यापिण्याच्या अन्य वस्तूसाठी 5 ते 10 हजार रुपये कारागृहातील पोलिसांची टोळी घेत होती. कारागृहात बंदिस्त असलेले श्रीकांत थोरात, गोपाल पराते आणि राहुल मेंढेकर या तिघांनी कारागृहातून गांजा आणि काही अन्य वस्तूंची चिठ्ठी एका जेल पोलीस कर्मचारी प्रशांत राठोडकडे दिली होती. ती चिठ्ठी ‘व्हॉट्सॲप’वर कारागृहाबाहेर असलेल्या अजिंक्य राठोड नावाच्या कारागृह पोलीस कर्मचाऱ्याला देण्यात आली. ती चिठ्ठी थेट बाहेर असलेल्या पानठेल्यावर जात होती. अशाप्रकारे हे रॅकेट चालवण्यात येत होते.
राठोड हा अन्य पोलीस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून गांजा थेट कैद्यापर्यंत पोहोचायचा. ही माहिती पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना मिळाली. त्यांनी गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर पर्वते यांच्या नेतृत्वातील पथकाला कारवाई करण्याचे आदेश दिले. पोलिसांनी सापळा रचून दोन्ही कारागृह पोलीस कर्मचाऱ्यांना ताब्यात घेतले आणि त्यांच्याकडून मोबाईल, सीमकार्ड आणि अन्य वस्तू जप्त केल्या.



























































