आरजे ते अभिनेता!

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शब्दांकन : गणेश आचवल

आरजे ते अभिनेता असा प्रवास करणारा आणि अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत भूमिका साकारणारा पृथ्वी अंबर आता ‘सरी’ या चित्रपटाच्या निमित्ताने मराठी चित्रपटसृष्टीत पदार्पण करतोय. त्यानिमित्ताने त्याच्याशी साधलेला संवाद…

> अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पणापूर्वी तू उत्तम आरजे होतास, त्याविषयी सांग…
– मला मीडिया, चित्रपट या गोष्टींची पहिल्यापासूनच आवड होती. मी उत्तम नृत्य करायचो. कन्नडमध्ये नृत्यावर आधारित एका
रिऑलिटी शोचा मी विजेता होतो. एकदा सहज मी रेड एफएमसाठी ऑडिशन दिली आणि त्यांना माझा आवाज आवडला. त्यानंतर साडेतीन वर्षे मी आरजे म्हणून काम केले. ‘आर जे नागराज’ या नावाने मी कार्यक्रम सादर करायचो. त्यानिमित्ताने अनेक मान्यवरांशी संवाद साधता आला. संगीत, चित्रपट या क्षेत्राबद्दल जाणून घेता आले.

> दाक्षिणात्य चित्रपटांकडे कसा वळलास?
– मी मास्टर्स इन जर्नलिझम केले आहे. प्रसारमाध्यमांची आवड होतीच. रीतसर ऑडिशन देऊन माझी निवड तुळू भाषेतील चित्रपटांसाठी झाली. कन्नड भाषेतील ‘दिया’ हा माझा चित्रपट खूप यशस्वी झाला. त्यानंतर अनेक दाक्षिणात्य चित्रपटांत मी काम केले.

> मराठीत काम करावं असं का वाटलं?
– मुळात मला मराठी भाषा आवडते. ‘नटरंग’, ‘सैराट’, ‘नटसम्राट’, ‘पावनखिंड’ हे माझे आवडते मराठी चित्रपट आहेत. मी अनेकदा कामानिमित्त मुंबई-पुण्याला येत असतो. माझे काही नातेवाईक आणि काही मित्र मराठी आहेत. मराठी चित्रपटसृष्टीमध्ये चांगल्या आशयाचे मराठी चित्रपट निर्माण होतात. त्यामुळे या मराठी चित्रपटसृष्टीचा एक भाग व्हावे असे मला वाटत होते. ती संधी मला ‘सरी’च्या निमित्ताने मिळाली.

> ‘सरी’मधील अनुभवाविषयी काय सांगशील?
– दिग्दर्शक के. एस. अशोक हे माझे गुरू आहेत. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या दाक्षिणात्य चित्रपटांत मी काम केले आहे. ‘सरी’चे दिग्दर्शक तेच आहेत. या चित्रपटात संधी मिळाल्यावर मला मराठी शिकणे आवश्यक होतेच आणि यासंदर्भात मला दिग्दर्शक आणि सहकलाकारांची मदत झाली. मला सर्वांनी मराठी उच्चार कसे असावेत याच्या व्हॉइस नोट्स पाठवल्या होत्या. त्याचा मला खूप फायदा झाला. यात मी ‘आदी’ ही व्यक्तिरेखा साकारत असून ती खूप संवेदनशील आहे. या चित्रपटातील सर्वच व्यक्तिरेखांची मांडणी उत्तम आहे.