
युवा कर्णधार पृथ्वी शॉचा विजय हजारे ट्रॉफीतील ‘वन मॅन शो’ गुरुवारीही सुरूच राहिला. त्याने झळकावलेल्या 165 धावांच्या विक्रमी खेळीच्या जोरावर मुंबईने कर्नाटकचा 72 धावांनी धुव्वा उडवला आणि अगदी दिमाखात अंतिम फेरीत प्रवेश केला. या स्पर्धेत मुंबईने सलग सातव्या विजयाला गवसणी घातली. मुंबईसमोर जेतेपदाच्या लढतीत उत्तर प्रदेशचे आव्हान असणार आहे. उत्तर प्रदेशने गुजरातला पराभूत करून फायनलमध्ये एण्ट्री मारली. पृथ्वी शॉने या स्पर्धेत चार शतकांसह सर्वाधिक 754 धावा फटकावताना एका मोसमात सर्वाधिक धावा करण्याच्या मयांक अग्रवालच्या 723 धावांना मागे टाकले हे विशेष.
नवा विक्रम नोंदवला
पृथ्वी शॉने या स्पर्धेत नव्या विक्रमाला गवसणी घातली. त्याने या मोसमात सर्वाधिक 754 धावा फटकावताना मयांक अग्रवालच्या 723 धावांच्या विक्रमालाही मागे टाकले. मयांक अग्रवालने 2017-18 च्या मोसमात विक्रम नोंदवला होता. मयांक अग्रवालचा विक्रम देवदत्त पडीकल यानेही मोडला. पण पृथ्वी शॉने या दोघांच्या धावांना लीलया मागे टाकले हे विशेष. पृथ्वी शॉने यावेळी कर्णधार म्हणून या स्पर्धेत तीन शतके झळकावत गौतम गंभीरच्या दोन शतकांच्या रेकॉर्डलाही मागे सारले.
गाजवली स्पर्धा
मुंबईचा युवा फलंदाज पृथ्वी शॉ याने विजय हजारे ट्रॉफीच्या या मोसमात सात सामन्यांमधून चार शतकांसह 754 धावांचा पाऊस पाडला आहे. 188.50 च्या सरासरीने त्याने या स्पर्धेत धावा काढल्या आहेत. या स्पर्धेत त्याने आतापर्यंत 21 खणखणीत षटकार व 95 दमदार चौकार चोपून काढले आहेत. कर्नाटकच्या देवदत्त पडीकलने सात सामन्यांमधून 737 धावा केल्या असून त्यानेही चार शतक झळकाविली आहेत. या स्पर्धेत सर्वाधिक धावा करणाऱया फलंदाजांच्या यादीत पृथ्वी शॉ पहिल्या क्रमांकावर तर देवदत्त पडीकल दुसऱया क्रमांकावर आहे. पण कर्नाटकचे या स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे. त्यामुळे देवदत्त पडीकलला यापुढे फलंदाजी करण्याची संधी मिळणार नाही.
स्टार खेळाडूंची अनुपस्थिती, पण धावांचा रतीब
मुंबईचे स्टार खेळाडू सध्या हिंदुस्थानी संघासोबत आहेत. रोहित शर्मा, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, शार्दुल ठाकूर हे खेळाडू इंग्लंडविरुद्धच्या टी-20 मालिकेसाठी अहमदाबाद येथे आहेत. अजिंक्य रहाणे नॉनस्टॉप क्रिकेट खेळत असल्यामुळे त्याने कसोटी मालिकेनंतर विश्रांती घेतली असावी. पण पृथ्वी शॉने स्वतःच्या नेतृत्वात मुंबईचा आत्मविश्वास कमी होऊ दिला नाही. त्याने सलामीला येऊन 165 धावांची देदीप्यमान खेळी साकारली आणि मुंबईला 322 ही धावसंख्या उभारून देण्यात अत्यंत मोलाची भूमिका बजावली. शम्स मुलानीने 45 धावांची खेळी केली. कर्नाटककडून विजयकुमारने 4 व प्रसिध कृष्णाने 3 फलंदाज बाद केले.
250 धावांपर्यंत मजल
मुंबईच्या 323 धावांचा पाठलाग करणाऱया कर्नाटकला 250 धावांपर्यंतच मजल मारता आली. देवदत्त पडीकलने 64 धावांची आणि बी. आर. शरथने 61 धावांची खेळी साकारली, पण एकाही फलंदाजाला मोठी खेळी करता आली नाही. मुंबईकडून तुषार देशपांडे, तनुष कोटीयन, प्रशांत सोलंकी व शम्स मुलानी यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले आणि मुंबईच्या विजयात मोलाचा हातभार लावला.
पृथ्वीची या स्पर्धेतील शतके
दिल्ली – नाबाद 105 धावा
पुडुचेरी – नाबाद 227 धावा
सौराष्ट्र – नाबाद 185 धावा
कर्नाटक – 165 धावा




























































