मुख्यमंत्रिपदाचा डाव हुकल्याने देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झालेत! – पृथ्वीराज चव्हाण

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुख्यमंत्रिपदाचा डाव हुकल्याने देवेंद्र फडणवीस वैफल्यग्रस्त झाले असून यामुळेच ते सरकारवर टीका करत आहेत. सरकार हातातून जाण्यास ते स्वतःच जबाबदार आहेत, असे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण म्हणाले. सोमवारी एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना त्यांनी हे विधान केले.

मंत्रिमंडळ विस्ताराबाबत बोलताना चव्हाण म्हणाले की, जो तो पक्ष आपले मंत्री ठरवेल आणि येत्या 2 दिवसांतमध्ये मंत्रिपदाबाबत अंतिम निर्णय होईल. तसेच तरुणांना संधी मिळालीच पाहिजे आणि 2 ते 3 वेळा आमदार असणाऱ्यांना पहिली संधी दिली जावी, असेही ते म्हणाले. ते पुढे म्हणाले की, पक्षश्रेष्ठी याबाबत निर्णय घेतील आणि काँग्रेस हायकमांड जो निर्णय घेऊन तो मान्य असेल.

झारखंडमध्ये काँग्रेस विजयाच्या उंबरठ्यावर असल्याबाबत त्यांना प्रश्न विचारला असता त्यांनी राज्य जिंकली तरी काँग्रेसला उभारी घेण्याची गरज आहे,असे उत्तर चव्हाण यांनी दिले. तसेच मला विधानसभा अध्यक्षपदासाठी विचारणा झाली होती, मात्र आम्ही नाना पटोले यांच्या नावाला पसंती दिल्याचेही ते म्हणाले.

#JharkhandResults दीड वर्षात भाजपने महाराष्ट्रासह 7 राज्य गमावली

भाजपकडून विरोधीपक्ष संपवण्याचा प्रयत्न
भारतीय जनता पक्षाने साम, दाम, दंड वापरुन विरोधीपक्ष संपवण्याचा प्रयत्न केला. अनेक नेत्यांना धमक्या देण्यात आल्या. अनेक नेत्यांना नाक घासायला लावून पक्षांतर करुन घेतले, म्हणून भाजपला रोखण्यासाठी आम्ही पूर्ण प्रयत्न केला, असेही पृथ्वीराज चव्हाण यावेळी म्हणाले. तसेच जलसंधारणाची योजना आमचीच होती. फडणवीसांनी केवळ ब्रँडिंग केलं आणि त्यांनी या योजनेचं ठेकेदारीकरण केले, असा आरोप चव्हाण यांनी केला.