
अंबाजोगाई शहर आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. ही वाढती रुग्णसंख्या लक्षात घेत शासकीय आरोग्य यंत्रणेवरील ताण कमी करण्यासाठी शहरातील खाजगी डॉक्टर संघटनेने पुढाकार घेतला आहे. या संघटनेचे 23 डॉक्टर शहरातील विविध विलगीकरण कक्षात स्वेच्छेने मोफत रुग्णसेवा करत आहेत. बीड जिल्ह्यातच नव्हे तर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात अशा प्रकारे मोफत रुग्णसेवा देणारे अंबाजोगाई हे एकमेव शहर असल्याचे सांगण्यात येत आहे.
अंबाजोगाई शहर आणि परिसरात कोरोनाबाधितांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढत आहे. शहर आणि परीसरातील गावात आढळलेले कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण गृहविलगीकरणाचे नियम पाळत नसल्याचे आढळून आल्यामुळे गृह विलगीकरण बंद करुन पॉझिटिव्ह रुग्णांना शासकीय विलगीकरण कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात येत आहे. त्यामुळे अंबाजोगाई, परळी, केज, धारुर, माजलगाव या तालुक्यातील अनेक पॉझिटिव्ह रुग्ण अंबाजोगाई येथील विलगीकरण कक्षातील उपचाराला प्राधान्य देत आहेत. त्यामुळे या विलगीकरणातील रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. या रुग्णसेवेचा ताण कमी करण्यासाठी खाजगी वैद्यकीय व्यवसाय करणाऱ्या डॉक्टरांची बैठक जिल्हाधिकारी रेखावार यांनी घेत विलगीकरण कक्षातील रुग्णांना वैद्यकीय सेवा देण्याचे आवाहन केले होते.
इंडियन मेडिकल असोसिएशनच्या शाखेचे अध्यक्ष डॉ. राजेश इंगोले यांनी या आवाहानाला प्रतिसाद देत संघटनेच्या सदस्यांसमोर विलगीकरण कक्षातील रुग्णसेवेचा प्रस्ताव ठेवला. या प्रस्तावाला सहमती दर्शवत संघटनेच्या 23 डॉक्टरांनी आपला खाजगी वैद्यकीय व्यवसाय सांभाळत विलगीकरण कक्षात मोफत रुग्ण सेवा करण्यास सुरुवात केली आहे. शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक वसतीगृह, टी.बी. गिरवलकर पॉलिटेक्निक विद्यार्थी वसतीगृह, कृषी महाविद्यालय वसतीगृह या शिवाय लोखंडी सावरगाव शिवारातील जम्बो कोविड विलगीकरण कक्षात हे डॉक्टर रुग्णसेवा करत आहे. डॉ. दत्तप्रसाद आवाड, डॉ. अनिल भुतडा, डॉ. सत्येंद्र बर्दापुरकर, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. हनुमंत चाफेकर, डॉ. राहुल डाके, डॉ. सुधीर धर्मपात्रे, डॉ. अभय इडगर, डॉ. प्रवीण गुजर, डॉ. प्रल्हाद गुरव, डॉ. राजेश इंगोल, डॉ. शेख जुबेर, डॉ. विनोद जोशी, डॉ. योगेश मुळे, डॉ. संदीप मोरे, डॉ. विजय फड, डॉ. दिपक पाटील, डॉ. सचिन पोतदार, डॉ. नितीन पोतदार, डॉ. श्रीनिवास रेड्डी, डॉ. अतुल शिंदे, डॉ. उध्दव शिंदे, डॉ. निलेश तोष्णीवाल, डॉ. पी. एम. झाडके हे 23 डॉक्टर शासकीय यंत्रणेला पूर्वसूचना देत विलगीकरण कक्षात अनेक दिवसांपासून रुग्णसेवा करत आहेत. कोरोना संकटात आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला असताना खासगी डॉक्टर मदतीला आल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत आहेत.
































































