प्रायव्हेट ट्रेनसाठी कोकणच्या गाडय़ा ‘सायडिंग’ला जाणार,चाकरमान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रेल्वे बोर्डाने शंभर मार्गावर 150 प्रायव्हेट ट्रेन चालवण्याची योजना आखली असून त्यातील 26 ट्रेन मुंबईतून चालवण्यात येणार आहेत. यातील काही ट्रेन कोकण मार्गावरदेखील चालवण्यात येणार असल्याने या खाजगी ट्रेनमुळे चाकरमान्यांचा प्रवास महागडा होणार आहे. शिवाय या ट्रेन लेट झाल्यास प्रवाशांना नुकसानभरपाई द्यावी लागणार असल्याने नेहमीच्या ट्रेन ‘सायडिंग’ टाकून रेल्वे प्रायव्हेट गाडय़ांना प्राधान्य देण्याचा धोका असल्याने चाकरमान्यांना दुहेरी फटका बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

रेल्वे फायद्याच्या मार्गावर प्रायव्हेट ट्रेन चालवत आहे. त्यामुळे कमी तिकिटाच्या साध्या ट्रेनला त्याचा फटका बसणार आहे. कारण दिल्ली ते लखनौ प्रायव्हेट ‘तेजस एक्स्प्रेस’ चालवताना या गाडीच्या प्रवाशांना मोफत इंशुरन्स आणि गाडी लेट झाल्यास ‘रिफंड’ मिळण्याची घोषणा आयआरसीटीसीने केली आहे. त्यामुळे या प्रायव्हेट गाडय़ांना लेट होऊ नये याची खबरदारी घ्यावी लागणार आहे. कारण गाडी एक ते दोन तास लेट झाल्यास प्रवाशांना प्रत्येकी शंभर रुपये तर दोन तासांपेक्षा जास्त लेट झाल्यास प्रत्येकी दोनशे रुपये नुकसानभारपाई द्यावी लागणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

फायद्याचे मार्ग आंदण मिळणार

कोकणात जाणाऱया मोजक्याच गाडय़ा चाकरमान्यांच्या फायद्याच्या असून त्यांना वर्षाचे बारा महिने गर्दी असते. कोकणकन्यासारखी गाडी नेहमीच गर्दीने तुडुंब भरलेली असते. ही गाडी सुटल्यानंतर अर्ध्या-एक तासाने अशीच दुसरी कोकणकन्या सोडली तरी ती तोटय़ात जाणार नाही इतकी या गाडीला प्रवाशांची मागणी आहे. अशा फायद्याच्या मार्गावर जर प्रायव्हेट ट्रेन चालवण्यात आली तर सामान्य जनतेला त्याचे तिकीट परवडणार नाही. खासगी कंपन्यांना हे फायद्याचे मार्ग आंदण दिल्यासारखेच असल्याची टीका नॅशनल रेल्वे मजदूर युनियनचे महामंत्री वेणू नायर यांनी केली आहे.