
भाजलेल्या चण्यांना आकर्षक रंग देण्यासाठी विषारी रसायनाचा वापर करण्यावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले आहे. चतुर्वेदी यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री जेपी नड्डा आणि अन्न प्रक्रिया मंत्री चिराग पासवान यांना पत्र लिहून यावर तत्काळ कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी एका अहवालाचा दाखला देत आपल्या पत्रात म्हटले आहे की, नुकत्याच एका अहवालानुसार ऑरामाइन हा एक इंडस्ट्रीअल डाय आहे. ज्याचा वापर कपडे आणि लेदरसाठी केला जातो. त्याचा वापर रंग गडद करण्यासाठी होतो. तोच ऑरामाइन भाजलेल्या चण्यांमध्ये वापरला जातो आहे. हे केवळ अन्न सुरक्षा नियमांचे उल्लंघन नाही तर, तमाम हिंदुस्थानी नागरिकांचे आरोग्य धोक्यात घालणारे आहे.
अन्न सुरक्षा आणि मानके कायदा, 2006 अंतर्गत अन्नात ऑरामाईन वापरावर बंदी आहे. तरी त्याचा सर्सासपणे वापर केला जात आहे. इंटरनॅशनल एजन्सी फॉर रिसर्च ऑन कॅन्सरने ते संभाव्य कार्सिनोजेन म्हणून ओळखले आहे. जागतिक आरोग्य संघटनेच्या मते हे कॅन्सरची निर्मिती करणारे घटक आहेत. जे लिव्हर, किडणी आणि मूत्राशयच्या कॅन्सरबरोबर मज्जासंस्थेवर परिणाम करते.
आरोग्यासाठी धोकादायक असल्याचे स्पष्ट इशारे आणि प्रतिबंध असूनही भेसळ सर्रासपणे सुरूच आहे. याच पार्श्वभूमीवर प्रियंका चतुर्वेदी यांनी या धोक्यापासून लोकांना वाचवण्यासाठी देशव्यापी जनजागृती मोहीम राबवावी. तसेच या विषारी रंगाचा वापर त्वरित थांबवून नागरिकांचे आरोग्य सुरक्षित ठेवण्यासाठी सरकारने ठोस पाऊले उचलावीत, अशी मागणी केली आहे. प्रियंका चतुर्वेदी यांनी आरोग्य मंत्रालयाला देशभरात धाडसत्र राबवून तपासणी आणि कडक कारवाई करण्याची मागणी केली आहे. या गंभीर धोक्यापासून लोकांना वाचवण्यासाठी देशव्यापी मोहीम राबवण्याचे आवाहनही त्यांनी केले आहे.

























































