
सामना ऑनलाईन । अयोध्या
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे अमेरिका, चीनसहित जगभरात फिरतात. तिथल्या नेत्यांच्या गळाभेटी घेतात. पण काही स्वतःच्या वाराणसी लोकसभा मतदारसंघात जावे, एखाद्या कुटुंबाला भेटावे असे त्यांना कधी वाटले नाही. त्यासाठी त्यांना सवडच नाही, अशा शब्दांत काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी-वढेरा यांनी आज येथे मोदी यांच्यावर जोरदार हल्ला चढवला.
प्रियंका गांधी यांनी फैजाबादच्या कुमारगंजपासून अयोध्येतील हनुमानगढीपर्यंत 47 किलोमीटरचा रोड शो केला. त्यात त्यांनी मोदी आणि भाजप सरकारवर निशाणा साधला. पंतप्रधान मोदी प्रचार इतका जोरात करतात की ते पाहून मला वाटले आपल्या मतदारसंघासाठी ते काहींना काही करत असतील, पण त्यांना तर वाराणसीत वरचेवर जायला वेळच मिळाला नाही. आपल्या मतदारसंघाकडे मोदी यांनी पाठ फिरवावी ही दुर्लक्षित करण्यासारखी गोष्ट नाही, असे प्रियंका गांधी म्हणाल्या. काँग्रेसच्या सरकारने तुम्हाला ‘मनरेगा’ योजना दिली. प्रत्येक कुटुंबाला 100 दिवसांचा रोजगार खात्रीने मिळावा असे त्या योजनेचे उद्दिष्ट होते असे सांगून त्या म्हणाल्या की, मोदीजी सत्तेवर आले आणि म्हणाले की, ‘मनरेगा’सारख्या योजनांसाठी पैसा नाही. आजघडीला त्या योजनेखाली जे लोक काम करतात त्यांना सहा-सहा महिने कष्टांचा मोबदला दिला जात नाही. हे चुकून घडले नसून जाणूनबुजून केले जात आहे. कारण मोदी सरकार हे रोजगार हिसकावणारे आहे.
“उद्योगपतींना कर्ज माफ करण्याची वेळ येते तेव्हा त्यासाठी मोदी सरकारकडे 317 हजार कोटी उपलब्ध असतात, पण शेतकऱयांनी कर्जमाफी मागितली आणि काँग्रेसने ‘न्याय’ योजना सांगितले तर हे सरकार सांगते पैसाच नाही”. – प्रियंका गांधी-वढेरा, सरचिटणीस, काँग्रेस
भाजपच्या बालेकिल्ल्यात पाच तास प्रचार
अयोध्या हे भाजपचे सत्ताकेंद्र असून पक्षाचा तो बालेकिल्ला आहे. प्रियंका गांधी यांनी तिथे आज तब्बल पाच तास ‘रोड शो’ करत प्रचार केला. त्याची जबाबदारी काँग्रेसचे लोकसभा उमेदवार आणि माजी उत्तर प्रदेशच्या पूर्वप्रांताचे अध्यक्ष निर्मल खत्री यांच्या शिरावर होती.




























































