
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी वाराणसीतून पंतप्रधान नरेंद्र मोदींविरोधात निवडणूक लढवण्याची शक्यता आहे. वाराणसीतून निवडणूक लढवण्यास प्रियंका तयार असल्याचे विधान पती रॉबर्ट वढेरा यांनी केले आहे. याबाबत अंतिम निर्णय पक्षाकडून घेतला जाईल असेही वढेरा यावेळी म्हणाले. ‘आज तक’शी बोलताना त्यांनी हे वक्तव्य केले आहे.
प्रियंका गांधी यांनी लोकसभा निवडणुकीपूर्वी राजकारणात प्रवेश केला. यानंतर त्यांना सरचिटणीसपद देण्यात आले आणि उत्तर प्रदेशमधील प्रचाराची जबाबदारी सोपवण्यात आली. प्रियंका यांनी राजकारणात प्रवेश केल्यापासून त्या निवडणूक लढवणार का याबाबत चर्चा सुरू झाल्या. याबाबत प्रियंका यांना अनेकदा पत्रकारांनी प्रश्नही विचारला. तेव्हा त्यांनी पक्ष निर्णय घेईल तो मला मान्य असेल असे म्हटले होते. आता त्यांचे पती रॉबर्ट वढेरांनी याबाबत स्पष्ट संकेत दिल्याने त्या मोदींविरोधात निवडणूक लढवण्याच्या शंकेला पाठबळ मिळत आहे.
वाराणसी हा पंतप्रधान नरेंद्र मोदींचा मतदार संघ आहे. या मतदार संघातून मोदी 2014 ला मोठ्या मताधिक्याने जिकंले होते. 2019 मध्येही मोदी याच मतदारसंघातून निवडणूक लढवणार आहेत. 26 एप्रिलला ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.





























































