सोहळा – माणकेश्वरची रामनवमी

  • प्रा. मिलिंद जोशी

धाराशीव जिह्यातील परांडा तालुक्यातील माणकेश्वर हे माझे जन्मगाव.  गावाला वळसा घालून वाहणारी विश्वरूपा नदी, तिच्या काठावर असणार महादेवाचं प्राचीन हेमाडपंती मंदिर, शेजारी महाराष्ट्रातील प्रसिध्द सटवाईचं मंदिर आणि गावातले जुने राममंदिर ही केवळ ग्रामस्थांचीच  नव्हे, तर अनेकांची दैवते.  लहानपणी शाळेला सुट्टी लागली की, माणकेश्वरला जाण्याची ओढ असायची. त्या वेळी बसची सोय नव्हती. वडील बैलगाडी पाठवायचे. बैलगाडीतून प्रवास करताना खूप मजा यायची. तिथंही मोठा वाडा होता. प्रेमळ आजी होती. गोठय़ात गाई-म्हशी होत्या. दूधदुभत्याची कमतरता नसायची. उन्हाळ्यात वाडय़ातल्या अनेक खोल्या पिकू घातलेल्या आंब्यांनी भरलेल्या असायच्या. रात्री माळवदावर झोपायला जायचं. आकाशातल्या चांदण्या पाहत झोपी जायचं. सूर्याची किरणं अंगावर येईपर्यंत लोळत पडायचं. जेवणं झाल्यानंतर विश्रांती घेतली की, वडिलांबरोबर शेतात जायचं. असे ते सोनेरी दिवस होते. सतत पडणाऱ्या दुष्काळानं शेतकऱ्यांचं कंबरडं मोडलं आणि आमच्या वाढत्या वयाबरोबर हे वैभव डोळ्यांसमोर निघून गेलं. सुट्टय़ा असल्या की, माणकेश्वरला जाणं व्हायचं; पण रामनवमीसाठी आवर्जून जाणं व्हायचं. माणकेश्वरच्या रामनवमीचा तो डौलदार उत्सव आणि त्याच्या आठवणी अजूनही मनात तशाच आहेत. एप्रिल महिन्यात कडाक्याचं ऊन पडायला सुरुवात झाली की, आनंदाची उधळण करीत गुढीपाडवा यायचा आणि दुसऱ्या दिवसापासून गावात रामनवमीच्या उत्सवाला प्रारंभ व्हायचा. प्रथमेपासून अष्टमीपर्यंत रोज एकाचं जेवण असायचं. त्याला सर्वजण प्रयोजन असं म्हणायचे. त्या काळात सर्वांनी पाहुणे- रावळे, मित्र-मित्रमैत्रिणींसह जेवायला यावे अशीच दवंडी गावात दिली जायची. ज्यांचं प्रयोजन असेल, त्यांच्या घरातल्या मंडळींची नुसती धांदल उडायची. दुपारी साडेअकरा-बाराच्या सुमारास भरजरी पातळांतल्या बायका, पुरुष मंडळी आणि पोरं ऊन लागू नये म्हणून डोक्याला काहीतरी बांधून मंदिराकडे धावायची. दुपारची आरती व्हायची. श्लोकांच्या गजरात पंगती उठायच्या. रामनवमीला संपूर्ण गाभारा फुलांनी सजवला जायचा. रामाचा पाळणा मध्यभागी बांधला जायचा. रामजन्माच्या कीर्तनातला उत्तररंग जसजसा जवळ यायचा तसतसा उत्साह आणखीनच वाढायचा. ‘कुलभूषणा दशरथ नंदना, बाळा जो जो रे’सारखे अनेक पाळणे वाद्यांच्या गजरात मंजूळ आवाजात म्हटले जायचे. ज्या घरात पाळणा हलला नाही अशा घरांतल्या बाईच्या ओटीत रामाची मूर्ती घातली जायची. ‘प्रभू रामचंद्र की जय’ अशा जयजयकाराने वातावरण दुमदुमून जायचे. जन्मकाळानंतर गावातली मंडळी आपापल्या घरून दशम्या, धपाटे आणि तांदळाची खिचडी असे पदार्थ घेऊन यायची. तिथेच अंगतपंगत व्हायची.

दशमीला आमचं प्रयोजन असायचं खरी मजा यायची ती एकादशीला. सर्वजण हातात टाळ घेऊन गावात घरोघर भिक्षा मागण्यासाठी जायचे. त्या वेळी खांद्याला झोळी असायची. ताम्हणात रामाची पितळेची मूर्ती असायची. ‘रघुपती राघव राजाराम । पतितपावन सीताराम ।’ असं भजन म्हटलं जायचं. प्रत्येकाच्या घरासमोर ही मिरवणूक थांबायची. घरासमोर पाट मांडलेला असायचा. ज्याच्या हातात ताम्हण आहे, त्याने त्या पाटावर उभं राहायचं. घरातल्या सुवासिनी ताम्हणातल्या रामाच्या मूर्तीला औक्षण करायच्या. यथाशक्ती धान्य किंवा पैशांच्या रूपानं उत्सवाला मदत करायच्या. मिरवणुकीतल्या लोकांना लिंबाचं सरबत किंवा पन्हं दिलं जायचं. द्वादशीचा दिवस महत्त्वाचा असायचा. कारण या दिवशी भंडारा असायचा. पहाटेपासून महाअभिषेकाला प्रारंभ व्हायचा. दुपारी भंडाऱ्यासाठी बनविलेले सर्व पदार्थ ज्या भांडय़ांत ते बनविलेले असायचे, ते त्या भांडय़ांसह गाभाऱ्यात आणून ठेवले जायचे. त्या पदार्थांचा घमघमाट सुटलेला असायचा. हातात झांजा घेतलेले उघडेबंब ग्रामस्थ धोतरावरच्या ढेऱ्या सावरत मूर्तीच्या दोन्ही बाजूंना उभं राहून वाद्यांच्या गजरात आरत्या म्हणायचे, तेव्हा स्वर्गीय आनंदाचा भास व्हायचा. जाळी जशीच भवऱ्याला ।।

फिरवीतसे कांता तशीच नवऱ्याला । 

लाज नसे हावऱ्याला । 

लावीतसे शेणपाणी गोवऱ्याला ।। 

असे हास्याची कारंजी उडविणारे श्लोक मोठमोठय़ा आवाजात म्हटले जायचे. प्रसादाचा कार्यक्रम रात्री आठपर्यंत चालायचा. भरपेट जेवल्यानंतर साठ आणि सत्तर जिलेब्या किंवा लाडू खाण्याच्या पैजा लागायच्या आणि त्या जिंकल्याही जायच्या. जेवणं झाल्यानंतर रात्रभर भजनं, भारुडं, गौळणी, नकला यांचे कार्यक्रम असायचे. अगदी लहान असल्यापासून त्यात माझा सहभाग असायचाच. एखादी गोष्ट सांगण्याची, त्या संपूर्ण कार्यक्रमाचं निवेदन करण्याची जबाबदारी माझ्याकडं असायची. दरवर्षी काहीतरी नवं सादर करण्यासाठी मी तयारी करायचो. रामनवमी ही माझ्यासाठी सांस्कृतिक आनंद देणारी पर्वणी ठरायची. रात्रभर सांस्कृतिक कार्यक्रम झाल्यानंतर पहाटेच्या सुमाराला रामाची मूर्ती झाकली जायची.

लगे लो लग्गा लो 

आकाशी लो बाई 

पकाशी लो 

अशी गाणी म्हणत संबळाच्या तालावर पोत खेळला जायचा. एका पुरुषाला देवीचं रूप दिलं जायचं. साडी, मळवट, बांगडय़ा यांनी सजवलं जायचं. त्याची पूजा केली जायची. सकाळी सहाला उत्तरपूजा करून आरती व्हायची. दहा-अकरा दिवस वेगळ्या उत्साहात न्हाऊन निघालेलं गाव त्या दिवशी दुपारी घरी जाऊन विश्रांती घ्यायचं. दुपारी बारा वाजता जोशी गुरुजींचं मांडव थापटणीचं जेवण असायचं. पिठल्याच्या  वडय़ा, आमटी, भाकरी-भात असा फक्कड बेत असायचा. त्या दिवशीच खरी उत्सवाची सांगता व्हायची आणि उत्सव संपल्याची चुटपुट मनाला लागायची.

(लेखक महाराष्ट्र साहित्य परिषद,पुणे येथील कार्याध्यक्ष आहेत.)

Twitter – [email protected]

आपली प्रतिक्रिया द्या