
शिवप्रेमी आणि हिंदुत्ववादी संघटनांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे अखेर ऐतिहासिक किल्ले विशाळगडावरील बेकायदेशीर व वादग्रस्त अतिक्रमणे काढण्याच्या शासकीय प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. अतिक्रमण हटविण्यासंदर्भात शिवदुर्ग संवर्धन समितीकडून कारसेवेच्या हालचाली होऊ लागल्यानंतर बैठक घेऊन प्रशासनाने कारवाईची तत्परता दाखवत विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आली आहे. या निविदांना 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत असून, प्रत्यक्ष मार्चमध्ये गडावरील अतिक्रमण हटविण्यास सुरुवात होण्याची शक्यता आहे.
विशाळगडावरील अतिक्रमण हटविण्यासाठी शिवप्रेमी, शिवदुर्ग संवर्धन समिती, हिंदुत्ववादी संघटना तसेच शिवसेना आक्रमक आहेत. येत्या महाशिवरात्रीपर्यंत गडावरील अतिक्रमण काढण्याचे आश्वासन प्रशासनाने दिले होते, पण कार्यवाही होत नसल्याने शिवसेनेने स्वतः कुदळ, फावडे घेऊन विशाळगडाकडे कूच केले होते. तर, शिवदुर्ग संवर्धन समितीकडून कारसेवेच्या हालचाली सुरू करण्यात आल्या होत्या. राज्यभरातून यासाठी शिवप्रेमींचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत होता. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याच्या शक्यतेने जिल्हा प्रशासनाकडून नुकतीच शिवप्रेमींची बैठक घेऊन तोडगा काढण्याचा प्रयत्न केला.
जिल्हाधिकाऱयांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या 7 डिसेंबरच्या बैठकीत गडावरील अतिक्रमण काढणे, बेकायदेशीर बांधकामे व इतर कामांसाठी प्रतिबंध करणे, फिर्याद दाखल करणे, न्यायालयीन प्रक्रिया, कॅव्हेट दाखल करण्यासह पुरातत्व विभागाच्या सहायक संचालकांची नियुक्ती करण्यात आली. या सहायक संचालकांकडे गडावरील अतिक्रमण काढण्यासाठी कोणतीही यंत्रणा नसल्याने त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यकारी अभियंत्यांना संपर्क केला होता.
दरम्यान, सार्वजनिक बांधकाम विभागाने यासाठी तयार केलेले अंदाजपत्रक पुरातत्व व वस्तुसंग्रहालय संचालनालयाच्या संचालकांनी 25 जानेवारी रोजी राज्य शासनाला सादर केले. यावर 3 फेब्रुवारी रोजी राज्य शासनाने विशाळगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी 1 कोटी 17 लाख 9 हजार रुपयांचा निधी मंजूर केला. या मंजूर निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विशेष प्रकल्पाचे कार्यकारी अभियंता एस. बी. काटकर यांनी शनिवारी निविदा प्रसिद्ध केली. त्यानुसार ही निविदा 23 फेब्रुवारी रोजी सायंकाळी पावणेसहापर्यंत ऑनलाइन पद्धतीने भरता येणार आहे. 27 रोजी तांत्रिक निविदा आणि 28 रोजी सकाळी 10 नंतर आर्थिक निविदा उघडण्यात येणार आहेत.





























































