
बेस्टसाठी 1,200 एकमजली आणि मिडी बस घेण्याचा प्रस्ताव बेस्ट समितीने तयार केला होता. परंतु चार महिने उलटूनही केंद्र सरकारकडून अनुदान न मिळाल्याने 1,200 बसगाडय़ांचा हा प्रस्ताव अखेर सोमवारी झालेल्या बेस्ट समितीच्या बैठकीत रद्द करण्यात आला आहे.
बेस्ट प्रशासनाने ऑक्टोबर 2021मध्ये 1,200 बस भाडेतत्त्वावर घेण्याचा निर्णय घेतला आणि त्यासाठी निविदाही काढली. या सर्व बस इलेक्ट्रीक आणि एसी आहेत. यात 800 बस एकमजली आणि 400 मिडी बस आहेत. या बसेससाठी महाराष्ट्र शुद्ध हवा अभियाना अंतर्गत तसेच केंद्र सरकारचे अनुदान मिळणार होते. यासाठी जवळपास पाच हजार कोटी रुपये खर्च अपेक्षित होता. परंतु यासाठी केंद्र सरकारचे अनुदानच प्राप्त झालेले नसल्याने हा प्रस्ताव अखेर रद्द करण्यात आला. यावर सोमवारी बेस्ट समितीच्या बैठकीत चर्चा झाली. बेस्ट समितीचे सदस्य अनिल कोकीळ यांनी मांडलेल्या या प्रस्तावाला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसकडून समर्थन मिळाले, तर भाजपाने विरोध केला. केंद्र सरकारचे अनुदान मिळण्यास उशीर होत होता. त्याऐवजी महाराष्ट्र शुद्ध हवा अभियाना अंतर्गत बसेस खरेदी करता आल्या असत्या. त्यामुळे हा एक मजली बसेस खरेदी करण्याचा प्रस्ताव रद्द करण्यात आला असल्याचे बेस्ट समितीचे अध्यक्ष आशीष चेंबूरकर यांनी सांगितले.


























































