
चित्रपट दिग्दर्शित करण्याचे अनेकांचे स्वप्न असते. कार्यकारी निर्माता असलेले सचिन दुबाले-पाटील यांचे दिग्दर्शक बनण्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ‘सेकंड हँड’ या चित्रपटातून ते त्यांचा दिग्दर्शकीय प्रवास सुरू करत आहेत. ब्रदर्स एंटरटेन्मेंट ही निर्मिती संस्था ‘सेकंड हँड’ या चित्रपटाची निर्मिती करत आहे. चित्रपटाची कथा सचिन-विष्णू यांची असून लेखन डॉक्टर भालचंद्र गायकवाड, अमित बेंद्रे यांचे आहे. अभिनेता सक्षम कुलकर्णी या चित्रपटात महत्त्वाच्या भूमिकेत आहे. ‘विषय आता खोलात जाणार…’ अशी या चित्रपटाची टॅगलाइन आहे.
मूळचे बीडचे असलेले सचिन दुबाले-पाटील कामाच्या शोधात पुण्यात आले. कॉफी शॉपमध्ये काम करायला सुरुवात केली. काम करताना चित्रपट क्षेत्रातील काही जणांशी त्यांची मैत्री झाली. त्यांच्याकडून चित्रपटाविषयी माहिती मिळायला लागली. बुममॅन म्हणून चित्रपट क्षेत्रात काम सुरू झाल्यावर पुढे कार्यकारी निर्माता म्हणून आठ ते दहा चित्रपट केले. ‘आटपाडी नाइट्स’, ‘अबक’, ‘हेडलाइन’, ‘बाजार’, ‘खिचिक’ असे चित्रपट कार्यकारी निर्माता म्हणून त्यांच्या नावावर आहेत.






























































