प्राध्यापक प्रेमसिंग चव्हाण यांचा प्रामाणिकपणा, सहा लाखांचा ऐवज परत केला

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नांदेड

मुंबई- नागपूर- नंदीग्राम एक्सप्रेसमध्ये मुंबईच्या प्रवाशांचे विसरलेले सहा लक्ष रुपयांचे दागिने यशवंत महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक प्रेमसिंग चव्हाण यांच्या प्रामाणिकपणामुळे मुंबईचे प्रवाशी समीर राठोड आणि सायली राठोड यांना शनिवारी परत मिळाले. सहा लक्ष रुपयांचे दागिन्यांची बॅग त्यांना परत मिळाल्यानंतर त्यांनी प्रा.चव्हाण व रेल्वे पोलिसांची आभार मानले आहे.

मुंबईच्या मेट्रो रेल्वेमध्ये काम करत असलेले सायन येथील अभियंता समीर राठोड व सायली राठोड हे आपल्या सासरी अर्थात उद्योजक उत्तमराव चव्हाण गितानगर नांदेड यांच्याकडे येत होते. ९ तारखेला पहाटे नंदीग्राम हि नांदेडला थांबल्यानंतर आपले सामान उतरवत असताना त्यांची दागिन्यांची बॅग मात्र रेल्वेतच राहिली. पहाटेची वेळ असल्याने सामान उचलताना गडबड झाली. त्यानंतर ते गितानगर येथे समीर राठोड व त्यांची पत्नी आपल्या सासरी आल्यानंतर त्यांना आपली बॅग रेल्वेतच राहिल्याचे कळाले. त्याच दरम्यान याच रेल्वेमधून प्रवास करणारे यशवंत महाविद्यालयाचे वरिष्ठ प्राध्यापक प्रेमसिंग चव्हाण यांच्या ही बॅग निदर्शनास आली. सदरची बॅग त्यांनी किनवट येथे उतरताच किनवट रेल्वेस्थानकावर स्टेशन मास्तर व आरपीएफ यांना सुपूर्द केली. रेल्वे पोलीस आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी याबाबतचा छडा लावला. तेंव्हा बी-१ २५ या बर्थवर समीर राठोड आणि त्यांची पत्नी सायली राठोड हे प्रवास करत होते. दरम्यान, समीर राठोड यांनी लगेच रेल्वे पोलिसांशी संपर्क साधून तक्रार नोंदवली होती. सर्व बाबींची शहानिशा करुन सहा लक्ष रुपये सोन्यांच्या दागिन्यांची बॅग अखेर रेल्वे पोलिसांनी त्यांना परत केली. प्रेमसिंग चव्हाण या प्राध्यापकांनी दाखविलेल्या कर्तव्यदक्ष व इमानदारीमुळे राठोड परिवाराचे हे दागिने परत मिळाल्याने राठोड परिवार आणि समीर राठोड यांचे सासरे उत्तमराव चव्हाण यांनी रेल्वे पोलिसांचे आभार मानले आहेत.