
सामना प्रतिनिधी । लोहा
मागील आठ ते दहा वर्षांपासून घरालगत असलेल्या खारीतील जमिनीच्या वाटणीवरून दोन सख्या भावात वाद होता. गत पाच दिवसांपूर्वी हे प्रकरण पोलिसात गेले होते. 26 ऑगस्ट रोजी सकाळी प्रातःविधीला गेलेल्या सख्या धाकट्या भावाचा मोठ्या भावाने मुलांच्या मदतीने खून केल्याची दुर्दैवी घटना रक्षाबंधनाच्या सणा दिवशी सकाळी साडेसात ते आठ वाजेच्या सुमारास घडली. मृत व्यक्ती आनंदराव घाटोळ हे माजी उपसरपंच होते.
लोहा तालुक्यातील बोरगाव येथील घाटोळ कुटुंबात वडिलोपार्जित जमिनीच्या थोड्या भूभागावरून मागील आठ ते दहा वर्षापासून वाद होता. भाऊराव ग्यानोबा घाटोळ (मोठा भाऊ) व आनंदराव ग्यानोबा घाटोळ (लहान भाऊ) या दोन सख्या भावात घरालगत आसलेल्या खारीतील प्लॉट व इतर जमिनीच्या वाटणीवरून वाद होता. मोठा भाऊ भाऊराव याने सदर प्लॉट व जमिनीतील हिस्सा लहान भाऊ आनंदराव यास दिला नसल्याने ते सातत्याने हिस्सा मागणी करत होते. यासंदर्भात आनंदरावने नातेवाईकांच्या पाच, सहा बैठकाही घेतल्या. परंतु मोठा भाऊ भाऊराव कोणासही जुमानत नव्हता. 20 गुंठे जमिनीचा हा वाद होता. 20 ऑगस्ट रोजी पावसाचे पाणी घरासमोरील नालीतून घरात येऊ नये म्हणून पाणी काढून देण्याच्या कारणावरून आनंदराव व त्यांचा पुतण्या मुरारजी यांच्यात वाद होऊन प्रकरण पोलिसात गेले व आनंदराव यांच्यावर सोनखेड पोलिसात गुन्हा नोंदविण्यात आला होता. यानंतर आज राखी पौर्णिमेच्या सणाच्या दिवशी सकाळी साडेसात ते आठ वाजेसुमारास आनंदराव घाटोळ (वय 51) हे प्रात:विधीसाठी घरालगत खारीत गेले आसता जुना वाद मनात धरून भाऊराव ग्यानोबा घाटोळ, पुतण्या मुरारजी भाऊराव घाटोळ व गणेश भाऊराव घाटोळ यांनी काठी व कत्तीच्या साह्याने जबर हल्ला केला, त्यामध्ये आनंदराव गंभीर जखमी झाले. जखमी आनंदराव घाटोळ यांना नांदेड येथील शंकराव चव्हाण शासकीय रूग्णालयात उपचारार्थ दाखल केले असता आज सकाळी 11:30 वाजता त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी सोनखेड पोलिसात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
summary: property dispute elder brother murdered younger one
























































