
शासकीय नोकर भरतीमध्ये कंत्राटीकरण थांबवावे, राज्यातील सरकारी शाळा बंद करण्याचा घेतलेला निर्णय रद्द करावा, शिक्षणाचे खासगीकरण थांबवावे, समूह शाळा प्रकल्पास विरोध, अशा विविध मागण्यांसाठी संगमनेरमध्ये विविध संघटनांच्या वतीने प्रांताधिकारी कार्यालयावर विराट जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला होता. या वेळी सरकारच्या विरोधातील घोषणांनी संगमनेर दुमदुमून गेले होते.
संगमनेर तालुका समन्वय समितीच्या वतीने विद्यार्थी, पालक, शिक्षक, विविध शासकीय, निमशासकीय कर्मचारी यांसह विविध संघटनांच्या वतीने यशोधन कार्यालय ते प्रांताधिकारी कार्यालय हा धडक मोर्चा झाला. यामध्ये आमदार सत्यजित तांबे, डॉ. सुधीर तांबे, नगराध्यक्षा दुर्गा तांबे, मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे, प्रा. हिरालाल पगडाल, प्रा. भाऊसाहेब चासकर, ‘छात्र भारती’चे अनिकेत घुले यांसह विविध संघटनांचे पदाधिकारा व सुमारे दहा हजार विद्यार्थी पालक व नागरिकांचा सहभाग होता.
यावेळी आमदार सत्यजित तांबे म्हणाले, कोणत्याही विभागात सरकारने कंत्राटी भरती करू नये. शिक्षण हा मूलभूत अधिकार असून, कोणतीही शाळा बंद करू नये. राज्यातील खेडय़ापाडय़ांतील लाखो मुले-मुली शिक्षणापासून वंचित राहण्याची भीती आहे. शिक्षणातील प्रयोगशाळा थांबवा; अन्यथा मुंबईपर्यंत धडक मोर्चा काढण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
यावेळी दुर्गा तांबे, मा. खा. भाऊसाहेब वाकचौरे, अनिकेत घुले, हिरालाल पगडाल, भाऊसाहेब चासकर, प्ऱा बाबा खरात, प्रा. गणेश गुंजाळ यांनीही मनोगत व्यक्त केले.
आमदार बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा
आमदार बाळासाहेब थोरात यांनी शिक्षणमंत्री असताना अत्यंत लोकाभिमुख निर्णय घेतले आहेत. सरकारच्या या निर्णयाविरोधात निघालेल्या जन आक्रोश मोर्चास आमदार बाळासाहेब थोरात यांचा पाठिंबा असल्याचे माजी आमदार डॉ. सुधीर यांनी सांगितले.
























































