पाण्यासाठी राजापुरात ग्रामस्थांचे उपोषण सुरूच, महिलांचा रास्ता रोकोचा इशारा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
villager-on-fast

सामना प्रतिनिधी । येवला

राजापूरलगतच्या वडपाटी पाझर तलावातून गावाला पाणीपुरवठा योजना करण्यासाठी वन विभाग अडथळे आणत परवानगीच्या मागणीसाठी ग्रामस्थांनी आजपासून बेमुदत उपोषणाला सुरुवात केली. मात्र वन विभागाने उपोषणाकडे दुर्लक्ष केल्याने दुसऱया दिवशी उपोषण सुरूच आहे. उद्या बुधवारी महिलांसह ग्रामस्थही रस्त्यावर उतरून आंदोलन करतील असा इशारा आज देण्यात आला.

प्रभारी सरपंच सुमन अलगट, माजी सभापती पोपट आव्हाड, ग्रामपंचायत सदस्य प्रमोद बोडखे, भारत वाघ, मीना अलगट, बाळू अलगट यांच्यासह ग्रामस्थांनी उपोषण सुरू केले असून जोपर्यंत वन विभाग या पाणीपुरवठा योजनेसाठी परवानगी देत नाही तोपर्यंत उपोषण सुरूच राहील असा निर्धार उपोषणकर्त्यानी केला आहे. ग्रामपंचायतीने वडपाटी पाझर तलावातून राजापूरसाठी पाणी आणून गावाची तहान भागविण्याचे प्रस्तावित केले आहे. मात्र वन विभाग वेगवेगळ्या परवानग्या व निकषांच्या आडून या योजनेला विरोध करत असल्याने पदाधिकारी व ग्रामस्थ उपोषणाला बसले आहेत. सहायक उपवनसंरक्षक कापसे यांनी आज भेट दिल्यावर ग्रामस्थांनी जंगलातील वन विभागाने केलेले सगळे पाणीसाठे कोरडे आहेत, मात्र गावाने लोकवर्गणीतून केलेल्या वडपाटीतच पाणी आहे मग तुम्ही का विरोध करता, असा सवाल केल्यावर कापसे यांना राग आला आणि ते उपोषण स्थळावरून उठून गेले. यामुळे ग्रामस्थही संतापले असून उद्या रास्ता रोकोचा निर्णय घेतला आहे. वडपाटीतच पुरेसे पाणी असल्याने विहीरी खोदण्यास व फक्त पाच महिन्यांसाठी पाणी उचलण्यास परवानगी मिळावी अशीही ग्रामस्थांनी यावेळी मागणी केल्याचे प्रमोद बोडके यांनी सांगितले. शेकडो ग्रामस्थ या उपोषणाला पाठिंबा देत आहेत. परवानगीचे आश्वासन मिळेपर्यंत उपोषण मागे घेतले जाणार नसल्याची भूमिका उपोषणकर्त्यांनी घेतली आहे.