हनिमूनला जायचंय, इलेक्शन ड्युटीपासून सूट द्या; पीटीच्या शिक्षकाची विनवणी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । जयपूर

निवडणुका हा तमाम हिंदुस्थानी जनतेसाठी महत्त्वाचा विषय. पण, निवडणुकांवेळी लागणारी इलेक्शन ड्युटी मात्र प्रचंड जबाबदारीचं आणि अनिवार्य काम असतं. ती टाळणं शक्य होईलच असं नाही. पण, राजस्थानमध्ये मात्र विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर एक गमतीदार घटना समोर येत आहे. हनिमूनला जाण्यासाठी इलेक्शन ड्युटीतून सूट मिळवण्याची मागणी करणारा एक अर्ज जिल्हा निवडणूक अधिकाऱ्यासमोर आल्याची घटना घडली आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, राजदीप लांबा असं या अर्जदाराचं नाव आहे. पीटी शिक्षक असलेल्या राजदीपची येथील चुरू जिल्ह्यातील एका गावात इलेक्शन ड्युटी लावण्यात आली होती. मात्र, नवपरिणित असलेल्या राजदीपने हनिमूनला जाण्यासाठी सुट्टी मागणारा अर्ज जिल्ह्याच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे केला. या अर्जात त्याने 29 नोव्हेंबर ते 11 डिसेंबरपर्यंत हनिमूनसाठी मॉरिशसला जात असल्याचं नमूद केलं. त्याखेरीज विमानाचं तिकीट आणि हॉटेल बुकिंगही त्याने अर्जासोबत सादर केलं.

राजस्थानच्या निवडणुका जाहीर होण्यापूर्वीच राजदीपने आपल्या हनिमून पॅकेजचं बुकिंग करून टाकलं होतं. या सर्वांवर सुमारे दीड लाख रुपये खर्च झाल्याचंही त्याने अर्जात म्हटलं होतं. जर त्याला इलेक्शन ड्युटी लागली असती, तर त्याचं नुकसान झालं असतं. त्यामुळे निवडणूक अधिकाऱ्याने त्याच्या अर्जातील बाबींची सत्यासत्यता पडताळून पाहून त्याला या ड्युटीतून सूट दिली.

याबाबत निवडणूक अधिकाऱ्याने सविस्तर माहिती दिली. त्यांच्या म्हणण्यानुसार, दररोज माझ्याकडे सूट मिळवण्यासाठी कित्येक अर्ज येतात. त्यात भन्नाट कारणं नमूद केलेली असतात. अगदी म्हैस आजारी आहे पासून ते हायपरटेन्शनचं निदान झाल्याचे अर्ज माझ्याकडे येतात. कर्मचारी ड्युटी टाळण्यासाठी खोटी कारणंही देतात. हातापायाला प्लॅस्टर गुंडाळून जखमी असल्याचा बनावही करतात. त्यामुळे मी राजदीप यांच्या अर्जातील सत्यता पडताळली. त्यांचं कारण योग्य असल्यानेच मी त्यांना ड्युटीतून सूट दिली, असं या अधिकाऱ्याने स्पष्ट केलं आहे.