
पुण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. येथील दोन अल्पवयीन मुलांनी एका 70 वर्षीय वृद्ध महिलेची हत्या केली आहे. शालिनी बबन सोनावणे (वय 70 ) असे मृत्युमुखी पडलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी पोलिसांनी या दोन मुलांना ताब्यात घेतलं असून त्यातील एकाच वय 14 वर्ष तर दुसऱ्याचं वय 16 वर्ष इतकं आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शालिनी बबन सोनावणे या घरी एकट्याच असताना काही चोर त्यांच्या घरात शिरले आणि त्यांची हत्या करून 1.6 लाख रुपयांची चोरी केली. ज्यात दागिन्यांचाही समावेश होता. ही घटना शनिवारी (30 ऑक्टोबर 21) सकाळी 11 ते रात्री 10 या वेळेत घडली. या घटनेनंतर सोनावणे यांचा मुलगा घरी आला असता त्याला त्या रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध पडल्याच्या दिसल्या. यानंतर मृत महिलेच्या मुलाने पोलिसात तक्रार केली.
मुलाच्या तक्रारीवरून सिंहगड रोड पोलीस ठाण्यात अज्ञाताविरोधात गुन्हा दाखल करून आरोपींचा शोध सुरू करण्यात आला. ज्या ठिकाणी ही घटना घडली त्या परिसरात पोलिसांनी चौकशी करण्यास सुरू केली. या दरम्यान परिसरातील लहान मुलांची पोलिसांनी चौकशी केली असता त्यांनी पोलिसांना सागितलं की, घटनेच्या दिवशी आमचे दोन मित्र पाणीपुरी खाण्यासाठी गेल्यानंतर पाणीपुरी न खाताच गडबडीने माघारी आले होते.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी या संशयित मुलांना ताब्यात घेतलं आणि त्यांची चौकशी करण्यास सुरुवात केली. सुरुवातीला या मुलांनी उडवाउडवीची उत्तरे दिली, मात्र नंतर पोलिसी खाक्या दाखवताच गुन्हा कबुल केला. ताब्यात घेतलेल्या मुलांनी आपला गुन्हा कबुल करत पोलिसांना सांगितलं की, सीआयडी मालिका पाहून पैसे चोरण्यासाठी आम्ही या महिलेची हत्या केली. दरम्यान, पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

































































