
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी पायी जाणाऱ्या दिंडीमध्ये भरधाव टेम्पो घुसल्याने झालेल्या अपघातात चार महिला वारकरी मृत्युमुखी पडल्या, तर 23 महिला वारकरी जखमी झाल्या. ही घटना पुणे-मुंबई महामार्गावर मावळ तालुक्यातील सातेगाव फाटय़ाजवळ आज पहाटे घडली.
जयश्री पवार (54), सविता येरम ( 58), विमल चोरघे (50), संगीता शिंदे (56) अशी मृत्युमुखी पडलेल्या महिला वारकऱ्यांची नावे आहेत.
मंदा वाघमारे (25), वनिता वाघमारे (35), रंजना वाघमारे (32) राजश्री सावंत (35), सुरेखा कर्णक (60), वंदना कर्णक (60), माणिक कर्णक (80), शोभा सावंत, पुष्पा पालकर, अनुसया जाधव, दिव्या दीपक धंदावत, आशा साबळे, रामदास आहेर, शारदा अनंता आहेर, सुमित्राबाई चोरघे, पुष्पांजली कर्णक, सुभद्रा शिताराम चोरघे, सोनाबाई धोरगे, रंजना कर्णक, राधिका भगत, पुष्पा पालकर, अनुसया बंडू जाधव, लक्ष्मण कर्णक, ताई बबन वाघमारे अशी जखमी महिला वारकऱ्यांची नावे आहेत. वडगाव-मावळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक विलास भोसले यांनी अपघाताबाबत माहिती दिली.
आळंदी येथील संत ज्ञानेश्वर महाराज संजीवन समाधी सोहळ्यासाठी खालापूर तालुक्यातील उंबरे येथील माऊली कृपा चॅरिटेबल ट्रस्टमार्फत 200 वारकरी पायी चालले होते. नायगाव येथील गुरुदत्त मंगल कार्यालयात शुक्रवारी रात्री मुक्काम करून पहाटे ते पालखीने आळंदीकडे प्रस्थान करताना हा अपघात झाला. जखमींवर कामशेत येथील महावीर हॉस्पिटल, सोमाटणे फाटा येथील बडे हॉस्पिटल, पवना हॉस्पिटल आणि कान्हे फाटा येथील शासकीय रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत.



























































