Pune Bandh – पुणे बंद आंदोलन, उदयनराजे भोसलेही मोर्चात सामील

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

छत्रपती शिवाजी महाराजांविषयी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी तसेच भाजपच्या नेत्यांकडून अवमानकारक विधाने करण्यात आल्याच्या निषेधार्थ पुण्यात बंदची हाक देण्यात आलेली आहे. या बंदमध्ये पुण्यातील मार्केट यार्डातील व्यापारीही सामील झाले असून सकाळी मार्केट यार्ड परिसरात शुकशुकाट पाहायला मिळाला. या बंदला शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसनेही पाठिंबा दर्शविला आहे. सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकर समितीच्या वतीने या बंदचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चाही काढण्यात आला असून यामध्ये खासदार उदयनराजे भोसले हे देखील सामील झाले आहेत.

देवेंद्र फडणवीसांना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आपुलकी आणि आदर असेल तर त्यांनी किमान सभागृहात निंदाजनक ठराव मांडला पाहिजे आणि कोश्यारी यांना पदावरून हटवण्यासाठी पत्र लिहिले पाहिजे अशी मागणी मोर्चात सामील झालेल्या शिवसेनेच्या सुषमा अंधारे यांनी केली आहे. ‘इथे कोणत्या पक्षाचा माणूस म्हणून नाही तर छत्रपती शिवाजी महाराजांचे मावळे म्हणून इथे एकत्र आलो आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दलचा आदर आणि प्रेम व्यक्त करण्यासाठी आम्ही इथे आलो आहोत. कोश्यारींना हटवा, निदाजनक प्रस्ताव मांडा आणि महापुरुषांचा अवमान कोणी करणार नाही यासाठी एक कडक कायदा करा अशी आमची मागणी आहे. आम्ही शांतताप्रिय आणि संसदीय चौकट मानणारे लोकं आहोत. आम्ही भाजपसारखे मस्तवाल, बेताल आणि संसदीय चौकट मोडणारी लोकं नाही आहोत.’ असे अंधारे यांनी म्हटले आहे.

पुणे बंदला विविध संघटना व संस्था पाठिंबा देत असून त्यामध्ये श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्ड आडते असोसिएशन, गणेश मंडळ,अखिल भारतीय बहुजन सेना, मुलनिवासी मुस्लिम मंच, छत्रपती संभाजी महाराज सेवा समिती, युवक क्रांती दल, स्वराज्य प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य यासह अनेक संघटनांचा जाहीर पाठिंबा दिला  आहे.

सर्वधर्मीय शिवप्रेमी पुणेकरांकडून राज्यपालांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ मूक मोर्चा ही काढण्यात आला आहे. छत्रपती संभाजी महाराज पुतळा येथून सकाळी 9.30 वाजता या मोर्चाला सुरुवात झाली. डेक्कन जिमखाना, टिळक चौक, लक्ष्मी रस्त्याने बेलबाग मार्गे लाल महाल येथे मोर्चाची सांगता होणार आहे. मोर्चाची सांगता झाल्यानंतर जाहीर सभाही होणार आहे. खासदार, उदयनराजे भोसले, छत्रपती संभाजी राजे, विरोधी पक्षनेते अजित पवार, शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे या जाहीर सभेला संबोधित करणार आहेत. शहर आणि जिह्यातील गणेशोत्सव मंडळे, विविध सामाजिक संघटना, संस्था, रिक्षा संघटना, व्यापारी संघटना मोर्चात सहभागी होणार आहेत.

100 अधिकाऱयांसह तब्बल 1 हजार कर्मचारी तैनात

पुणे बंद’च्या पार्श्वभूमीवर शहरात कायदा—सुव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून तगडा बंदोबस्त तैनात केला  आहे. त्यामध्ये 100 अधिकारी आणि एक हजारांवर कर्मचारी, साध्या वेशातील कर्मचारी, विविध पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे.