‘बीएचआर’ घोटाळ्याप्रकरणी अवसायक जितेंद्र कंडारे याला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

भाईचंद हिराचंद रायसोनी (बीएचआर) पतसंस्थेत कोट्यावधी रूपयांचा आर्थिक घोटाळा केल्याप्रकरणी मुख्य फरार आरोपी अवसायक जितेंद्र कंडारे याला पुणे पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेच्या पथकाने सोमवारी रात्री मध्यप्रदेशातील इंदोरमधून अटक केले. त्यामुळे आतापर्यंत अटक केलेल्या आरोपींची संख्या 18 वर पोहोचली आहे.

आर्थिक गुन्हे शाखेच्या विशेष पथकाने 27 नोव्हेंबर 2020 ला जळगावात छापेमारी करून महत्त्वाची कागदपत्रे, पुरावे, संगणक जप्त करून संशयितांना अटक केली होती. त्यानंतर जानेवारीत मुख्य संशयित सुनील झंवर याचा मुलगा सूरज यालाही पोलिसांनी अटक केली. आरोपींनी संगनमत करून स्वतःसह काही लोकांच्या आर्थिक फायद्याच्या उद्देशाने अपहार आणि फसवणूक केल्याचे तपासात निष्पन्न झाले होते. ‘बीएचआर’ पतसंस्थेचे फॉरेन्सिक ऑडिट करण्यासाठी लेखापरीक्षक म्हणून जैन यांना नेमले होते. त्याने आर्थिक घोटाळा उघडकीस आणणे अपेक्षित असताना प्रत्यक्षात मात्र त्यानेच खोटी कागदपत्रे तयार केली. त्याचा ठरावीक लोकांनाच फायदा होईल, यासाठी प्रयत्न केले होते.

पतसंस्थेचे तत्कालीन अवसायक जितेंद्र कंडारे यानेही ठेवीदारांची मोठी फसवणूक केली. ठेवीदारांमध्ये भीती निर्माण ठेवीदारांच्या पावत्यांमध्ये 15 ते 35 टक्के इतकी रक्कम घेऊन कोट्यावधी रूपयांचा अपहार केला होता. मागील सात महिन्यांपासून कंडारे पसार झाला होता. त्याच्या तपासासाठी आर्थिंक गुन्हे शाखेच्या पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली होती. त्यानुसार कंडारे याला काल मध्यप्रदेशातील इंदोरमध्ये एका वसतीगृहातून ताब्यात घेण्यात आल्याची माहिती नवटके यांनी दिली आहे.