अखेर पुणे महापालिकेचे उपायुक्त संदीप कदम यांची उचलबांगडी

महापालिकेच्या घनकचरा विभागातील भोंगळ कारभार अखेर उपायुक्त संदीप कदम यांच्या पदावर गदा आणून गेला आहे. अनेक दिवसांपासून असलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपांनंतर कदम यांची उचलबांगडी करत त्यांच्याकडून घनकचरा विभागाची जबाबदारी काढून घेण्यात आली असून ती अविनाश सपकाळ यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. तर कदम यांना मोटार वाहन विभागाकडे हलवण्यात आले आहे.

घनकचरा विभागातील टेंडरवाढीचे खेळ, मुदत संपलेल्या निविदांना खास ठेकेदारांच्या बळावर मिळालेल्या मुदतवाढी, तसेच देवाची उरूळी येथील सायंटिफिक लँडफिलिंगमधील धक्कादायक ‘लिचेड घोटाळा’ यामुळे विभागावर संशयाचे सावट होते. प्रक्रिया न करता लिचेडमध्ये पाणी मिसळून पुन्हा त्याच कचर्‍यावर फवारणे आणि तरीही ‘प्रक्रिया झाल्याचे’ बिल ठेकेदाराला अदा करणे, ही महापालिकेच्या कारभाराची लाजिरवाणी पातळी दाखवणारी घटना ठरली.

लोणी काळभोर प्रकरणही भोवले

लोणी काळभोर येथे महापालिकेच्या नावाखाली वनजमिनीवर टाकला जाणारा अवैध कचरा, लिचेडमुळे दूषित होत असलेले पाणी, प्रदूषित शेती—या प्रकरणाने तर महापालिकेची स्वच्छता मोहीमच उघडी पडली. महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत चौकशीचे आदेश दिले होते. नवनियुक्त अतिरिक्त आयुक्त पवनीत कौप यांनी अनियमितेवर शिक्कामोर्तब केल्यानंतर कदम यांच्या पदावर कारवाई अपरिहार्य ठरली.

शिवसेनेचाही पाठपुरावा

रामटेकडी आणि हांडेवाडी येथील प्रत्येकी ७५ टन क्षमतेच्या कचरा प्रक्रिया प्रकल्पांच्या निविदांतील बोगस कागदपत्रांचा भंडाफोड शिवसेनेने (उद्धव बाळासाहेब ठाकरे) केला. स्पर्धा कमी करून एका मर्जीतल्या ठेकेदाराला लाभ देण्यासाठी नियम बदलल्याचे पुरावे सादर करण्यात आले. कमी दर देणार्‍या दोन ठेकेदारांना शुल्लक कारणांनी बाद करून महागात बोली लावणार्‍यांना पात्र ठरवण्यात आल्याचा आरोप करण्यात आला. या सर्वांच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेने महापालिकेतील अतिरिक्त आयुक्तांच्या टेबलावर कचरा फेकत तीव्र निषेध व्यक्त केला होता. चौकशीचे आदेश लागल्यानंतर कदम अडचणीत आले होते.