कॉसमॉस बँक सायबर दरोड्यात उत्तर कोरियाचा हात?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । पुणे

कॉसमॉस बँकेवर सायबर हल्ला करून 94 कोटी रुपयांच्या दरोड्याचं उत्तर कोरिया कनेक्शन आहे. संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेने दिलेल्या माहितीनुसार, या दरोड्यामागे उत्तर कोरियाचा सहभाग असण्याची शक्यता आहे. उत्तर कोरिया आर्थिक प्रतिबंधांपासून वाचण्यासाठी सायबर हल्ल्यांचा ढालीसारखा वापर करत असावा, असंही परिषदेने म्हटलं आहे.

नवभारत टाइम्सने दिलेल्या वृत्तानुसार, संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेच्या एका पॅनलने या प्रकरणाचा तपास केला होता. तब्बल सात महिन्यांनंतर त्या पॅनलने आपला अहवाल सादर केला आहे. हा सायबर दरोडा घालण्यासाठी बँकेच्या यंत्रणेवर मालवेअरने हल्ला केला गेला. ज्याच्या माध्यमातून व्हिसा आणि रुपे डेबिट कार्डामधून व्यवहार होतात, त्याच यंत्रणेवर हा हल्ला करण्यात आला. त्यानंतर या मालवेअरचा मागोवा घेण्यात आला. त्यानंतर या पॅनलला काही देशांमधून होणाऱ्या सायबर हालचालींची माहिती कळली होती. या हल्ल्यामागे लजारस नावाच्या हॅकर समूहावर संशय व्यक्त करण्यात आला होता. या समूहातील अनेक जण हे उत्तर कोरियाशी संबंधित आहेत. त्यावरून हा हल्ला उत्तर कोरियातूनच केला गेला असावा, असा अंदाज या पॅनलने आपल्या अहवालात व्यक्त केला आहे.

11 ते 13 ऑगस्ट 2018 या कालावधीत पुण्यातील कॉसमॉस बँकेचे सर्व्हर हॅक करण्यात आले होते. या हल्ल्यामध्ये तब्बल 94 कोटी 42 लाख रुपये लुटल्याचे उघड झाले होते. यामध्ये तब्बल 413 बनावट डेबिट कार्डांच्या माध्यमातून 2 हजार 849 व्यवहार करण्यात आले. 12 हजार व्यवहार हे व्हिसी कार्डद्वारे करण्यात आले असून, त्यामाध्यमातून 78 कोटी आणि स्विफ्ट व्यवहाराच्या माध्यमातून 13 कोटी 92 लाख रुपये बँकेतून लुटून नेण्यात आले. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.