नोकरीच्या आमिषाने फसवणूक करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश, पुणे सायबर पोलिसांची कामगिरी

परदेशात नोकरी लावण्याच्या आमिषाने तरूणांची ऑनलाईन मुलाखत, व्हिसा, वैद्यकीय चाचण्यांच्या नावाखाली साडेचार लाखांची आर्थिक लूट करणाऱ्या टोळीचा पुणे पोलिसांच्या सायबर विभागाने पर्दापाश केला आहे. या प्रकरणी विशाल मीनानाथ जमदाडे (वय – 24) यास अटक करण्यात आली आहे. त्याचा साथीदार अनुप डोरमले याला एका गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी अटक केली असून त्याला लवकरच ताब्यात घेतले जाणार आहे.

तरूणांना फोन करून परदेशात नोकरीला लावण्याच्या आमिषाने लूट करणारी टोळी नगरमधील पारनेरमध्ये असल्याची माहिती सायबर पोलिसांना मिळाली. त्यानुसार पथकाने पारनेरमध्ये सापळा रचून विशाल जमदाडेला ताब्यात घेतले. चौकशीत त्याने साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. न्यायालयाने त्याला 18 एप्रिलपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.

जमदाडे याच्या टोळीतील अनुप डोरमले याला एका गुन्ह्यात गुजरात पोलिसांनी अटक केली आहे. त्याचा लवकरच ताबा घेतला जाणार आहे. या प्रकरणी इतरांचा शोध सुरू असून आरोपींनी आणखी किती जणांची फसवणूक केली आहे, यासंदर्भात तपास सुरू असल्याची माहिती सायबर पोलिसांनी दिली आहे.

ही कामगिरी पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, अपर पोलीस आयुक्त अशोक मोराळे, पोलीस उपायुक्त भाग्यश्री नवटके, सहायक पोलीस आयुक्त डॉ. शिवाजी पवार, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत, अंकुश चिंतामण, संदेश कर्णे, अस्लम आत्तार, मंगेश नेवसे, योगेश वाव्हळ, नितीन चांदणे, सोमनाथ भोरडे, प्रसाद पोतदार, शिरीष गावडे, शितल वानखेडे यांच्या पथकाने केली.

आमिषापासून दूर राहण्याचे आवाहन

सायबर चोरट्यांकडून नागरिकांना ऑनलाईन नोकरी, लॉटरी, बक्षिस, लोन मंजूर करण्याचे आमिष दाखवून आर्थिंक गंडा घातला जात आहे. संबंधित चोरट्यांकडून नागरिकांना भुरळ घालून लूट केली जात असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे अशा आमिषापासून नागरिकांनी दूर राहण्याचे आवाहन सायबर पोलिसांनी केले आहे. संबंधित घटनांसंदर्भात कोणी विचारणा करीत असल्यास सायबर पोलिसांशी संपर्क साधण्याचे सांगण्यात आले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या