गोळीबार करून पैसे लुटणारे गजाआड, ग्रामीण पोलिसांकडून गुन्ह्याचा छडा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पुणे-सोलापूर रस्त्यावरील इंदापूर भागातील वरकुटे पाटी येथे चारचाकी गाडी अडवून गोळीबार करीत 3 कोटी 60 लाख रुपयांची रोकड लुटणाऱ्या सहा जणांना पुणे ग्रामीण पोलिसांच्या पथकाने ताब्यात घेतले. यातील तिघांना माढा तालुक्यातील कुर्डुवाडी येथून तर तिघांना राजस्थान येथून ताब्यात घेतले आहे. त्यांच्याकडून 1 कोटी 43 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत. गुन्ह्यात आणखी आरोपींचा समावेश असल्याची शक्यता असून त्यादृष्टीने तपास सुरू असल्याची माहिती पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली.

सागर शिवाजी होनमाने (34),  बाळु उर्फ ज्योतीराम चंद्रकात कदम (32, दोघे. रा. कुर्डुवाडी, जि. सोलापूर), रजत अबू मुलाणी (24, रा. न्हावी, इंदापूर) अशी कुर्डुवाडी येथून ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. तर, गौतम अजित भोसले (३३, रा. म्हाडा), किरण सुभाष घाडगे (26), भुषण लक्ष्मीकांत तोंडे (25, रा. दोघे. इंदापूर) अशी राजस्थान येथून ताब्यात घेण्यात आलेल्यांची नावे आहेत. यातील सागर होनमाने हा रेकॉर्डवरील सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर गांजा खरेदी विक्री प्रकरणी यापुर्वी गुन्हे दाखल आहेत. 26 ऑगस्ट रोजी सोलापूर रस्त्यावरील इंदापूर भागातील वरकुटे पाटी येथील ही घटना घडली होती. याबाबत भावेशकुमार अमृत पटेल (रा. गुजरात) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांचा कुरीअर सव्र्हिसचा व्यवसाय असून ते नांदेड, लातूर व सोलापूर येथील पार्सल घेऊन 26 तारखेला सोलापूर रस्त्याने मुंबईला जात होते.

वरकुटे पाटी परिसरात गाडी आली असता  पाठीमागून आलेल्या गाडीतील एकाने फिर्यादी यांच्या गाडीवर फायरीगं केली. त्यानंतर फिर्यादी व त्यांच्या सहकाऱ्यांना मारहाण करून 3 कोटी 60 लाख रुपयांची रक्कम चोरून नेली होती. याप्रकरणी दाखल गुन्ह्यात ग्रामीण पोलिसांची स्थानिक गुन्हे शाखा, इंदापूर पोलीस यांनी प्रत्येकी तीन पथके तयार करून आरोपींचा शोध सुरू केला. महामार्गावरील सीसीटीव्ही आणि इतर माहितीच्या आधारे लुटमार करणारे आरोपी हे कुर्डुवाडी भागात असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कुर्डुवाडी येथून सागर होनमाने, कदम, मुलाणी यांना ताब्यात घेतले.

त्यांची झडती घेतल्यानंतर होनमाने याच्याकडे 72 लाख तर मुलाणीकडून 71 लाख 20 हजार असे 1 लाख 43 हजार रुपये पोलिसांनी जप्त केले. त्यांच्याकडे मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांनी त्यांच्या आणखी तीन साथीदारांना राजस्थानमधील उदयपूर येथून ताब्यात घेतले. आरोपींनी गुन्हा केल्याची कबुली दिली असून गुन्ह्यात आणखी काही साथीदार असण्याची शक्यता आहे. तसेच, त्यांना याबाबत नेमकी माहिती कुठून मिळाली, याबाबत तपास करण्यात येत असल्याचे देशमुख यांनी सांगितले. पोलीस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख,  अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ निरीक्षक अशोक शेळके, इंदापूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक  प्रभाकर मोरे यांच्या पथकाने ही कामगिरी केली.