
मोक्का या गंभीर गुन्ह्यातील आरोपीला पोलिसांच्या तावडीतून पळून जाण्यास मदत करणार्या दोघांना गुन्हे शाखा युनिट चारच्या पथकाने अटक केली. प्रणव उर्फ चिक्या अर्जुन रणधीर (19, रा. हवेली), तन्मय उर्फ पिल्लुड्डया तानाजी धिवार (19, रा. हवेली), अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. मार्केटयार्ड पोलिसांनी मोक्का कारवाई करून अटक केलेला आरोपी संतोष पवार हा पोलिसांवर हल्ला करून पसार झाल्याची घटना गेल्या आठवड्यात घडली.
संतोष पवार याला तपासासाठी खाणापूर परिसरात नेले असता तेथून त्याने पळ काढला. यावेळी रणधीर, धिवार यांनी त्याला दुचाकीवरून पळून जाण्यासाठी मदत केली होती. तेव्हापासून पोलीस आरोपींच्या मागावर होते. यादरम्यान संशयित आरोपी रणधीर, धिवार हे बोपोडी परिसरात येणार असल्याची माहिती गुन्हे शाखेला मिळाली. मिळालेल्या माहितीवरून पथकाने सापळा रचून दोघांना ताब्यात घेतले. गुन्हे शाखेचे अप्पर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे, उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली युनिट चारचे पोलीस निरीक्षक गणेश माने, महेंद्र पवार, संजय आढारी, विनोद महाजन यांच्यासह पथकाने ही कारवाई केली.
























































