पत्नीसोबत फोनवर बोलणे निवृत्त पोलिसाला पडले सव्वा लाखांना

पत्नीचा फोन आल्यामुळे बोलत असताना एटीएम सेंटरमध्ये कार्ड तसेच ठेवल्याची संधी साधून चोरट्याने एटीएमकार्डची अदलाबदली करून निवृत्त कर्मचाऱ्याला तब्बल 1 लाख 30 हजार रूपयांचा गंडा घातला. ही घटना वानवडीतील जगताप चौकातील एटीएममध्ये घडला. या प्रकरणी निवृत्त पोलीस माधव ज्ञानदेव धायगुडे (वय – 61, रा. हांडेवाडी रोड, हडपसर) यांनी वानवडी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

सहायक पोलीस निरीक्षक जयवंत जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, धायगुडे निवृत्त पोलीस कर्मचारी असून ते आणि मुलगा 7 जूनला जगताप चौकातील एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. एटीएममधून पैसे निघत नसल्याने त्यावेळी तेथे असलेल्या एकाने त्यांना दुसऱ्या बँकेच्या एटीएममधून पैसे निघतात असे सांगितले. त्यामुळे त्यांची तरूणासोबत बाचाबाचीही झाली.

त्यांनी संबंधिताला ‘तू मला सांगु नको’, असा सज्जड दमही दिली. त्यानंतर धायगुडे आयडीबीआय बँकेच्या एटीएममध्ये पैसे काढण्यासाठी गेले असताना तोच आरोपी त्यांच्या मागे येऊन उभा राहिला. एटीएममधून पैसे काढत असताना त्यांना पत्नीचा फोन आला. ते फोनवर बोलत असताना कार्ड एटीएम मशीनमध्येच राहिले. त्याचा फायदा घेत आरोपीने एटीएमकार्डची अदलाबदली करून त्यांचे कार्ड चोरले. यानंतर त्याच दिवशी बँकखात्यातून 1 लाख 30 रूपये परस्पर काढून फसवणूक केली.

आपली प्रतिक्रिया द्या