
- नवनाथ शिंदे
पुणे नागरिकांकडून सोशल मीडियाचा वापर मोठया प्रमाणावर वाढल्याने सायबर गुन्ह्यांमध्येही दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. विशेषतः ऑनलाईन व्यवहारात होणाऱ्या फसवणुकीचे प्रमाणही वेगाने वाढत आहे. त्यामध्ये किरकोळ विक्रेत्यांपासून ते छोटे-मोठे उद्योगधंदे करणाऱ्यांची होणारी फसवणूक चिंतेची बाब बनली आहे. सायबर पोलिसांकडून वारंवार आवाहन करूनही नागरिकांकडून खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळे सायबर पोलीस ठाण्यात दिवसाला शेकडो तक्रारी अर्ज दाखल होत आहेत.
सायबर चोरट्यांनाकडून विविध आमिषे, भूलथापा, गिफ्टसह अनेक कारणांनी पुणेकारांना फसविले जात आहे. त्यामुळे वाढती सायबर गुन्हेगारी पुणे पोलिसांचा डोकेदुखी ठरत आहेत. बहुतांश नागरिकांकडे अॅड्रॉईड मोबाइल असल्यामुळे ऑनलाईन व्यवहारांचे प्रमाण कित्येक पटीने वाढले आहे. त्यामुळे हातगाडीवरील खाद्यपदार्थ विक्रेत्यांपासून मोठमोठ्या दुकानांमध्ये फोनपे सह गुगल पेवर सर्रासपणे व्यवहार केले जात आहेत. प्रत्यक्षात मात्र, सायबर चोरट्यांनी त्यामध्येही फसवणूकीचा उद्योग सुरू केल्याचे अनेक घटनांवरून दिसून आले आहे. ऑनलाईनरित्या व्यवहार न केल्यास धंद्यावर होणारा परिणाम लक्षात घेउन अनेकांकडून रिस्क घेतली जात आहे. मात्र, ही रिस्क अंगलट आल्याचेही प्रकार घडले आहेत. त्यामुळे एकीकडे व्यवसायातील स्पर्धा आणि दुसरीकडे सायबर चोरट्यांची चलाखी अनेकांना लाखोंचा गंडा घालत आहे.दर महिन्याला दीड हजारांवर तक्रारींची नोंद पुणे सायबर पोलीस ठाण्यात केली जात आहे. तुलनेत गंभीर गुन्हे कमी असताना, सायबर गुन्हेगारी वाढल्याने चिंता व्यक्त केली जात आहे.
पुण्यात वाढत्या सायबर गुन्हेगारीमुळे स्वंतत्र सायबर पोलिस ठाणे सुरू करण्यात आले. 2019 वर्षी सायबर पोलिस ठाण्याकडे गुन्ह्यांचे 7 हजार 795 अर्ज आले होते. त्यामध्ये नागरिकांच्या आर्थिक फसवणूकचे प्रमाण अधिक होते. त्यानंतर 2020 सायबर पोलिस ठाण्यांकडे 14 हजार 950 अर्ज आले आहेत. हे प्रमाण तुलनेत दुप्पटीपेक्षा जास्त होते. त्यानंतर जानेवारी ते डिसेंबर 2021 अखेर 19 हजारांवर सायबर फसवणूकीचे तक्रारी अर्ज दाखल करण्यात आले. त्यामध्ये ऑनलाईन बँकिंग फ्रॉडसह, गिफ्टचे आमिष, उच्च पदावर नोकरी लावण्याचे सांगून फसवणूकीत खूपच मोठी वाढ झाली आहे. सोशल मिडीयावरून होणारे गुन्हे, ऑनलाईन खरेदीमध्ये फसवणुकीच्या गुन्ह्यात मोठी वाढ झाली आहे.
सायबर पोलीस ठाण्यात अपुरे मनुष्यबळ
पोलीस आयुक्तालयातंर्गत असलेल्या बहुतांश पोलीस ठाण्यातंर्गत अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांची संख्या 120 ते 140 असते. प्रत्यक्षात मात्र, सर्वाधिक कामाचा बोजा असलेल्या सायबर पोलीस ठाण्यात मनुष्यबळाचा अभाव असल्याचे दिसून आले आहे. त्यातच विविध प्रकारचे घोटाळे उघडकीस आणून तपास करताना अधिकाऱ्यांना तारेवरची कसरत करावी लागत आहे. त्यामुळे अनेक कर्मचाऱ्यांसह अधिकाऱ्यांना साप्ताहिक सुटीवरही कामावर यावे लागत आहे. सायबर पोलिस ठाण्यात नोंदविण्यात येणारे गुन्हे वाढत असल्यामुळे कर्मचाऱ्यांवर कामाचा अधिकचा ताण येत आहे.
चौकट- पुण्यातील सायबर आणि गंभीर गुन्हे
वर्ष गुन्ह्यांची संख्या गंभीर गुन्हे
2019 7 हजार 795 8 हजार 677
2020 13 हजार 793 5 हजार 265
2021 19 हजार 03 6 हजार 314
2022 4 हजार 140 490
ऑनलाईन व्यवहार दुधारी तलवार
ऑनलाईनरित्या व्यवहार करताना काळजी न घेतल्यामुळे सायबर चोरट्यांची चांदी झाली आहे. मोबाईलवरून जेवणाची ऑर्डर देताना नंबरची खातरजमा न करणे, परदेशातील गिफ्टच्या आमिषाच्या जाळ्यात अडकणे, ऑनलाईन खरेदी-विक्री करताना बँकखात्याची गोपनीय माहिती शेअर करणे, ओळख सांगून उपचारासाठी फसवणूकीच्या घटनांचे पेव वाढले आहे. विशेषतः जेष्ठ महिलांसह नव्याने मोबाईल वापरणाऱ्यां नागरिकांना आमिष दाखवून फसविले जात आहे. ऑनलाईन खरेदी-विक्रीच्या फॅडमुळे नागरिकांना फायदा होत आहे. दुसरीकडे मात्र, सायबर चोरट्यांकडून गैरफायदा घेउन नागरिकांना गंडा घातला जात आहे.
ऑनलाईन व्यवहार करताना नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. विशेषतः छोट्या-मोठ्या व्यवसायिकांनी ऑनलाईन व्यवहार करताना खबरदारी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे आर्थिंक फसवणूक टाळण्यास मदत होणार आहे. त्याशिवाय गिफ्टच्या आमिषासह सायबर चोरट्याच्या फसव्या कॉलला प्रतिसाद देऊ नये. त्याशिवाय फेसबुक,इन्स्टाग्राम, ट्वीटर, विविध बँकांचे अॅप वापरताना काळजीपुर्वक हाताळणी गरजेची आहे.
-डी. हाके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सायबर पोलीस ठाणे, पुणे

























































