डंपरच्या धडकेत सायकलस्वार विद्यार्थिंनी ठार, लोहगावमधील पठारे वस्ती परिसरातील अपघात

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

क्लासला चाललेल्या सायकलस्वार विद्यार्थिनीला भरधाव डंपरचालकाने दिलेल्या धडकेत तिचा मृत्यू झाला. हा अपघात 5 सप्टेंबरला दुपारी साडेतीनच्या सुमारास लोहगावमधील पठारे वस्ती परिसरात घडला.

रोशनी बाबा अंगरखे (वय 16 रा. पठारे वस्ती, लोहगाव) असे ठार झालेल्या विद्यार्थिंनीचे नाव आहे. याप्रकरणी तिचे वडील बाबा अंगरखे (वय 50) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यानुसार डंपरचालकाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रोशनी ही सोमवारी दुपारी सव्वातीन वाजण्याच्या सुमारास सायकलवर क्लासला चालली होती. एम.जी. ब्रीलिएंट शाळेनजीक भरधाव डंपरचालकाने तिला धडक दिली. त्यामुळे खाली पडल्यामुळे रोशनी गंभीररित्या जखमी झाली. उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले. सहायक पोलीस निरीक्षक मिलींद पाठक तपास करीत आहेत.

दुचाकीस्वाराच्या धडकेत जेष्ठ पादचारी ठार

पुणे- भरधाव दुचाकीस्वाराने दिलेल्या धडकेत जेष्ठ पादचारी ठार झाला. हा अपघात 5 सप्टेंबरला सकाळी सहाच्या सुमारास औंधमधील माळी प्रशिक्षण केंद्रासमोरील रस्त्यावर घडला. भीमराव शेटीबा कांबळे (वय 69 रा. बोपोडी) असे ठार झालेल्या जेष्ठाचे नाव आहे. हर्षवर्धन कांबळे (वय 32) यांनी चतुःशृंगी पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक वैशाली सुळ तपास करीत आहेत.