पुण्यात बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट उद्ध्वस्त, 5 ते 50 हजारांमध्ये विक्री करणाऱ्या टोळीला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह इतर महाविद्यालयांच्या नावाने बोगस पदव्या बनवून विक्री करण्याचे काम टोळीकडून पाच वर्षांपासून सुरू होते. संबंधित बनावट प्रमाणपत्रे कोणालाही ओळखू येऊ नये, यासाठी टोळीने हुबेहुब मॅफलिनो कागदाचा वापर केल्याचे तपासात उघड झाले आहे. त्यामुळे प्रकरणाची पाळेमुळे तपासण्यासाठी प्राधान्य दिल्याची माहिती पुणे ग्रामीण स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस निरीक्षक अशोक शेवाळे यांनी दिली आहे.

बनावट प्रमाणपत्रे विक्री करणाऱ्या टोळीला पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. टोळीप्रमख गणेश संपत जावळे (रा. नीरा), मनोज धुमाळ (रा. नीरा) आणि वैभव लोणकर (रा. बारामती) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह काही महाविद्यालयाच्या नावाने बोगस पदव्या बनवून विक्री करण्यात येत असल्याची माहिती सहायक पोलीस निरीक्षक संदीप येळे यांना मिळाली होती. त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने विद्यापीठाच्या कर्मचाऱ्यांना शहानिशा करण्यास घेऊन नीरा येथील समीक्षा प्रिंटिंग प्रेसमध्ये धाड टाकली. त्यावेळी आरोपी बनावट प्रमाणपत्रे बनवीत असल्याची खात्री झाली. त्यानुसार पथकाने बनावट पदवी तयार करण्यासाठी लागणारे साहित्य जप्त केले आहे.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहीते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अशोक शेळके, एपीआय संदिप येळे, रविराज कोकरे, अनिल काळे, सचिन घाडगे, गुरू जाधव, अभिजित एकशिंगे, स्वप्नील अहिवळे, अजय घुले, राजू मोमीन, प्रसन्ना घाडगे यांनी केली.

टोळीकडून अशी ही बनवाबनवी

ग्रामीण भागातील गरजू तरूणांना बनावट कागदपत्रे देण्यासाठी टोळीकडून 5 ते 50 हजारांपर्यत रक्कम घेतली जात होती. त्यासाठी आरोपी नापास झालेल्यांची कागदपत्रे ताब्यात घेत होते. त्यावरील मूळ विद्यापीठाचा लोगो पाण्याने काढून टाकत होते. त्यानंतर संबंधित लोगो बनावट कागदपत्रांवर चिटकवित होते. त्यामुळे आरोपींनी तयार केलेली कागदपत्रे विद्यापीठाप्रमाणेच हुबेहुब दिसत होती.

तिघांकडे होती वेगवेगळी जबाबदारी

बनावट कागदपत्रे देण्यासाठी प्रत्येकाने काम विभागून घेतले होते. त्यानुसार एक आरोपी फक्त सावज टिपण्यासाठी काम करीत होता. त्यानंतर दुसरा आरोपी पैसे घेऊन कागदपत्रे जमा करीत होता. त्यानुसार नीरा येथील समीक्षा प्रिंटींग प्रेसमध्ये बनावट प्रमाणपत्रे तयार केली जात होती.

”गरजू तरूणांना आवश्यक कागदपत्रे देण्यासाठी आरोपी हजारो रूपये घेत होते. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापाठासह काही आयटीआय संस्था, महाविद्यालयांच्या नावाने टोळीने बनावट प्रमाणपत्रे विक्री केली आहे. याप्रकरणी आणखी तपास सुरू आहे.”

अशोक शेळके, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण