
सामना प्रतिनिधी । पुणे
खरं तर बाळ जन्माला येणे म्हणजे कुटूंबीयांसाठी आनंदोत्सव असतो. पण काही वेळा संतापजनक अनुभव येतो. विमाननगर येथे पाच दिवसाच्या गोंडस चिमुरडीची विल्हेवाट लावण्यासाठी तिच्या आईने झुडपात फेकून दिले. पण तेथील काही जणांना रडण्याचा आवाज आल्यानंतर या अर्भकाला रूग्णालयात दाखल करून तिचे प्राण वाचविले. याप्रकरणी येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. महिला पोलीस शिपाई वंदना शिंदे यांनी यासंदर्भात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रविवारी सायंकाळी साडे सातच्या सुमारास मर्स कंपनीच्या मागच्या बाजूला साकोरेनगर-विमाननगर येथील झाडीमध्ये अर्भक टाकल्याचे समोर आले. पोलीस शिपाई शिंदे यांनी तेथे जाऊन पहाणी केली असता, या अर्भकाच्या डाव्या पायाला खरचटल्याचे दिसले. त्यांनी हे चार ते पाच दिवसांचे स्त्री जातीचे अर्भक त्वरीत रूग्णालयात दाखल केले. हे अर्भक व्यवस्थित असून, तिला ससून रूग्णालयातील श्रीवत्स संस्थेत दाखल करण्यात आले आहे.
हे बाळ अनैतिक असंबंधातून जन्मास आलेले असावे किंवा तिचा जन्म लपवून ठेवण्याच्या कारणामुळे तिला झाडीत फेकून दिल्याची शक्यता आहे. हे कृत्य करणाऱ्यावर गुन्हा दाखल केला आहे.
महिला सहाय्यक निरीक्षक एम. ए. टुले म्हणाल्या, झाडीमध्ये बाळ टाकल्याची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला देण्यात आली होती. त्यानुसार येरवडा पोलीस ठाण्यातील कर्मचारी तेथे गेले. स्त्री जातीचे अर्भक व्यवस्थित असून, ससून रूग्णालयातील श्रीवत्स संस्थेत दाखल केले आहे. हे अर्भक फेकून देणाऱ्यांचा शोध सुरू आहे.





























































