पुणे – शासकीय कामात अडथळा निर्माण करणाऱ्या तिघांना अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
crime

औंध परिसरातील एका इमारतीखाली मद्यपान करत बसलेल्यांविरुद्ध कारवाईसाठी गेलेल्या पोलीस नाईकाच्या कामात अडथळा आणणाऱ्या तिघांना चतुःशृंगी पोलिसांनी अटक केली. ही घटना काल पहाटे पावणेतीनच्या सुमारास औंधमधील दौलत पार्क सोसायटी परिसरात घडली. रमण शिशिरकुमार सेठ (वय 29, रा. दौलत पार्क सोसायटी), आकाश सुरेश सिंग राणा (वय 29, रा. येरवडा) आणि गुनगुन लोशाली (वय २४,रा. मगरपट्टा सिटी, हडपसर) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. याप्रकरणी दत्ता गेंगजे यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काल मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास औंधमधील दौलत सोसायटी परिसरात काही तरुण मद्यपान करत असल्याची माहिती पोलिस नियंत्रण कक्षाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस नाईक दत्ता घटनास्थळी गेले. त्यावेळी रमण, आकाश आणि गुनगुन यांनी आरडा-ओरडा करीत मोबाईलमध्ये छायाचित्रण केले. ते प्रसारित करण्याची धमकी देउन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक राजेंद्र दहिफळे अधिक तपास करीत आहेत.