
निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आलेल्या महिलेला रूम मिळवून देण्याच्या बहाण्याने इमारतीत नेउन पिस्तूलाचा धाक दाखवून तिच्यावर अत्याचार केल्याची घटना 5 जानेवारीला हडपसरमध्ये घडली आहे.
संजय बाजीराव भोसले (वय 52, रा. उरुळी कांचन, ता. हवेली) असे अटक केलेल्याचे नाव आहे. त्याच्याविरूद्ध बलात्कार आणि आर्मस अॅक्ट प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी उत्तर प्रदेशातील गाझीयाबाद येथील 39 वर्षाच्या महिलेने हडपसर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गाझीयाबामधील पीडित महिला मणक्याचा त्रास असल्याने उरुळी कांचन येथील निसर्गोपचार केंद्रात उपचार घेण्यासाठी आल्या होत्या. अनेक दिवस उपचार घ्यायचे असल्याने त्यांना राहण्यासाठी भाड्याने रुम पाहिजे होती. त्यासाठी महिला खोलीचा शोध घेत असताना त्यांनी संजय भोसले यांच्याकडे भाड्याने रूमबाबत विचारणा केली. तेव्हा त्याने 5 जानेवारीला दुपारी रुम दाखविण्याचा बहाणा करुन महिलेला हडपसर परिसरातील सोसायटीत नेले. तेथे पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केला. ही बाब कोणाला सांगितल्यास बघून घेईन, अशी धमकी आरोपीने पीडितेला दिली. याप्रकरणी गुन्हा दाखल होताच हडपसर पोलिसांनी आरोपी संजय भोसले याला उरळी कांचनमधून अटक केली. सहायक पोलीस निरीक्षक चेतन थोरबोल तपास करीत आहेत.
































































