
मोबाईल फोनवर हुक्क्याची ऑर्डर स्वीकारून ग्राहकांना विक्री करणाऱ्याला खंडणी व अमंली पदार्थ विरोधी पथकाने जेरबंद केले. त्याच्याकडून 700 हुक्का फ्लेवर पाकीट, 29 हुक्का पॉट, चिलीम पाईप मिळून 1 लाख 45 हजारांचा ऐवज जप्त करण्यात आला. मोहम्मद मंजरुल हक (वय 44) असे जेरबंद केलेल्याचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, येरवडा परिसरात एकजण मोबाईल फोनवर हुक्क्याची ऑर्डर घेउन विक्री करत असल्याची माहिती खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली. त्यानुसार पथकाने सापळा रचून बनावट ग्राहक पाठवून खात्री केली. त्यावेळी मोहम्मद हुक्क्याची विक्री करीत असल्याचे दिसून आले. त्यानुसार त्याला ताब्यात घेउन येरवडा पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले. ही कामगिरी वरिष्ठ पोलीस निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नीलेशकुमार महाडिक, प्रमोद मगर, रमेश गरुड, मंगेश पवार, मोहन येलपले यांच्या पथकाने केली.
सलग दोन दिवस हुक्का विक्रेत्यांवर कारवाईचा बडगा
संचारबंदीतही शहरात अंमली पदार्थांची विक्री जोमाने होत असल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर खंडणी व अंमली पदार्थ विरोधी पथकाने सलग दोन दिवस हुक्का विक्रेत्यांविरुद्ध कारवाई केली आहे. गुरुवारी कोंढव्यातील लुल्लानगरमध्ये हुक्क्याची ऑनलाईन विक्री करणाऱ्या दोघांना जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून दीड लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला. त्यानंतर येरवड्यात हुक्क्याची विक्री करणाऱ्याला पथकाने जेरबंद केले.




























































