
लॉकडाउनमुळे काम बंद असल्याने कामगाराने शक्कल लढवित चोऱ्या सुरु केल्या. ओएलक्सवरून मोबाईल विक्रेत्यांना बोलावून त्यांच्याकडील मोबाईल घेउन पसार होणाऱ्या सराईताला स्वारगेट पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून १६ मोबाईल, १ लॅपटॉप आणि १ दुचाकी असा ६ लाख रूपयांचा ऐवज जप्त केला आला आहे.
देवराम नारायण चिल्लावार (वय २२, रा. कारेल बाभळसर रस्ता रांजणगाव) असे अटक केलेल्याचे नाव आहे. देवराम मुळचा यवतमाळ जिल्ह्यातील रहिवाशी आहे. तो रांजणगाव भागातील एका कंपनीत नोकरी करीत होता. मात्र, लॉकडाउनमुळे काम बंद झाल्यामुळे तो बेरोजगार झाला होता. त्यानंतर त्याने चोरी करण्यासाठी नवीन शक्कल लढविली होती. ओएलएक्सवर मोबाईल विक्रीची जाहिरात पाहून खरेदीच्या बहाण्याने त्याने अनेकांचा मोबाईल घेउन पळ काढला होता. त्यानंतर एकेदिवशी त्याने मोबाईल खरेदी करायचा आहे अशी बतावणी करीत विव्रेâत्याला स्वारगेट येथे बोलाविले होते. त्यानंतर मोबाईल पहायच्या उद्देशाने हातात घेवून ‘आता माझ्याजवळ कॅश नाही चला एटीएममधून काढून देतो’ असे सांगितले. त्यानंतर एटीएमजवळ गेल्यानंतर मोबाईलसह तेथून धूम ठोकली. त्यानंतर त्याला सापळा रचून अटक करण्यात आली. त्याच्याविरुद्ध लोणीकंद, चाकण, यवत, चंदननगर आणि खडकी पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. अशारितीने कोणाचा मोबाईल चोरीस गेला असेल तर नागरिकांनी संपर्क साधण्याचे आवाहन स्वारगेट पोलिसांनी केले आहे. ही कामगिरी स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवाडी सहायक पोलीस निरीक्षक अमोल रसाळ, पोलीस उपनिरीक्षक सुरेश जायभाय, सज्जाद शेख, महेश जगताप, महेश काटे, सचिन दळवी, शिवाजी सरक, सोमनाथ कांबळे, सोनाली खुटवड यांच्या पथकाने केली.





























































