पिस्तूल आणि कोयत्यासह दहशत पसरविणाऱ्या तडीपाराला अटक

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पिस्तूल आणि कोयत्यासह परिसरात दहशत पसरविणाऱ्या तडीपाराला भारती विद्यापीठ पोलिसांनी अटक केली. एप्रिल 2019 पासून त्याला पुणे, पिंपरी-चिंचवड, पुणे ग्रामीण हद्दीतून दोन वर्षांसाठी तडीपार करण्यात आले होते. मात्र, तरीही तो शनिनगर परिसरात आल्यानंतर त्याला अटक करण्यात आले. पप्पू उर्फ प्रवीण अनंता येणपुरे (वय 27, रा. आंबेगाव खुर्द ) असे अटक केलेल्याचे नाव आहे.

भारती विद्यापीठ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शनिनगरमध्ये हातात कोयता घेउन दुकानदारांना एकजण धमकावीत असल्याची माहिती पोलीस अमंलदार सर्फराज देशमुख आणि अभिजीत जाधव यांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी घटनास्थळी जाउन तडीपार पप्पू उर्फ प्रवीणला ताब्यात घेतले. त्याच्याकडे गावठी पिस्तूल आणि काडतुस सापडले आहेत. ही कामगिरी पोलीस उपायुक्त सागर पाटील, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगन्नाथ कळसकर, पोलीस निरीक्षक संगीता यादव, पोलीस निरीक्षक प्रकाश पासलकर, तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक नितीन शिंदे सावंत यांच्या पथकाने केली.