
शहरातील नवले ब्रीज परिसरातील अपघातांचे सत्र कायम असल्याचे पुन्हा एकदा दिसून आले आहे. पिकअप चालकाने अचानक दाबलेल्या ब्रेकमुळे चार वाहने एकमेकांना धडकल्यामुळे अपघात झाला आहे. कात्रजकडून वडगावच्या दिशेने जाणाऱ्या वाहनांची धडक झाल्यामुळे परिसरात वाहतूककोंडी झाली होती. सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
पिकअप चालकाने अचानक ब्रेक दाबल्यामुळे कंटेनर धडकला. त्यापाठोपाठ अलिशान मोटारीसह डिझेल टँकरने धडक दिली. त्यामुळे परिसरात वाहतूककोंडी झाली होती. अपघाताची माहिती मिळताच भारती विद्यापीठ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेउन वाहतूककोंडी सोडविली. अपघातामध्ये कोणीही जखमी झाले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.




























































