
नऱ्हे येथील हरीहरेश्वर पार्क भागात एका सोसायटीच्या तळमजल्यावर पार्किंग केलेल्या सहा वाहनांना आग लागल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्री घडली. माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेत आग अटोक्यात आणली. आगीत चार दुचाकी आणि दोन चारचाकी वाहनांचे नुकसान झाले असून आगीचे कारण समजू शकले नाही.
नऱ्हे भागातील हरिहरेश्वर पार्क सोसायटीत पहाटे अडीचच्या सुमारास वाहनांना आग लागल्याची माहिती अग्निशमन दलाला रहिवाशांनी दिली. सोसायटीतील रहिवाशी तळमजल्यावर आले. त्यांनी पाण्याचा मारा करुन आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. माहिती मिळताच अग्निशमन दलाचे केंद्रप्रमुख प्रकाश गोरे, जवान भरत गोगावले आदींनी घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर काही मिनिटांत आग आटोक्यात आली. आगीमुळे सोसायटीतील तळमजल्याच्या छताला काही प्रमाणात आगीची झळ पोहोचली आहे. आगीच्या घटनेत चार दुचाकी, दोन चारचाकींचे नुकसान झाले आहे. तळमजल्यावर लावण्यात आलेल्या वाहनांना आग लावण्यात आल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे.




























































