
लॉकडाऊनमध्ये अत्यावश्यक कामांसाठी पुणे पोलिसांकडून तब्बल 4 लाख 2 हजार 243 नागरिकांच्या प्रवासाला ई-पास देण्यात आला. त्यामध्ये वैद्यकीय उपचारासह नातेवाईकांच्या अंत्यविधीसाठी प्रवास करणाऱ्या नागरिकांना तातडीने पास दिला जात होता.
राज्यात आंतरजिल्हा प्रवासासाठी ऑनलाइन माध्यमातून ई-पासची अट नुकतीच रद्द करण्यात आली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यात लॉकडाउन करण्यात आला होता. त्यामध्ये नागरिकांना आंतरराज्य, आंतरजिल्हा आणि शहरात विनाकारण फिरण्यास मनाई करण्यात आली होती. मात्र, अत्यावश्यक कामासाठी अनेक नागरिक, कामगार, शिक्षण आणि स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी शहरात आलेले विद्यार्थी अडकले होते. त्यासाठी शहर पोलिसांकडून 24 मार्चपासून ऑनलाइन माध्यमातून डिजिटल ई-पास देण्याची सुविधा सुरू करण्यात आली होती. त्या सुविधेआंतर्गत 31 ऑगस्टपर्यन्त 4 लाखांवर नागरिकांना इ पासेस वितरित करण्यात आले आहे. पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर ऑनलाइन अर्ज केल्यानंतर त्याची पडताळणी करून ई-पास देण्यात येत होते.
मजूर करण्यात आलेले ई-पासचे अर्ज
- आपत्कालीन वैद्यकीय उपचार – 79779
- अंत्यविधीला जाण्यासाठी – 18612
- वैयक्तिक कारण – 116393
- विद्यार्थी – 20285
- इतर महत्त्वाची कारणे – 166634
- एकूण वितरित पासेस- 4 लाख 2 हजार 243
लॉकडाऊन कालावधीत अत्यावश्यक कामांसाठी नागरिकांना प्रवास करता यावा पोलिसांकडून ई पास देण्यात येत होता. त्यानुसार जवळपास पाच महिन्यात 4 लाखांवर पासेस वितरण करण्यात आले आहेत. सर्व कर्मचारी आणि संबंधित अधिकारी यांनी उत्कृष्ट काम केल्यामुळे लॉकडाऊनमध्येही नागरिकांचा प्रवास सुखकर झाला आहे. – बच्चन सिंह, पोलीस उपायुक्त, गुन्हे शाखा




























































