Pune crime पाच दिवसात दोन पेट्रोलपंप लुटले, पोलिसांनी टोळीला अवघ्या तीन दिवसात पकडले

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

शिरुर तालुक्यातील पाषाणमळा आणि न्हावरा परिसरातील दोन पेट्रोल पंपावर दरोडा टाकणार्‍या टोळीला पुणे ग्रामिण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने अटक केली आहे. आरोपींनी पहिल्या गुन्ह्यानंतर लगेचच चार दिवसांनी दुसर्‍या ठिकाणी दरोडा टाकला. पोलिसांनी चौघांना अटक केली असून त्यांच्याकडून गुन्ह्य्यातील हत्यारे जप्त करण्यात आली आहेत.

करण युवराज पठारे (वय – 20, रा.गुजरमळा, शिरुर), रोहन सोमनाथ कांबळे (वय – 20, रा. बोर्‍हाडेमळा, शिरुर), अजय जगननाथ माळी (वय – 23, रा. श्रीगोंदा) आणि अजय सोमनाथ लकारे (वय – 21, रा. श्रीगोंदा) अशी अटक आरोपींची नावे आहेत. त्यांचे दोन साथीदार फरार असून त्यांचा शोध घेण्यात येत आहे, अशी माहिती पोलीस अधिक्षक अंकीत गोयल यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, शिरूर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सुरेशकुमार राऊत उपस्थित होते.

12 नोव्हेंबर रोजी शिरूर तालुक्यातील पाषाणमळा भागातील पेट्रोलपंपावर चौघांनी दरोडा टाकला. येथील कामगारांना हत्याराचा धाक दाखवून 49 हजारांची रोकड लुटली. यानंतर चार दिवसांनी येथील न्हावरा गावच्या हद्दीत असलेल्या दुसर्‍या एका पंपावर दरोडा टाकून 1 लाख दोन हजारांची रोकड लुटली.

सलग दोन दरोडे एकाच तालुक्यात पडल्याने पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखा आणि शिरुर पोलिसांची पथके तयार केली. यानुसार माग काढून पठारे आणि त्याच्या तीन साथीदारांना पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्याकडे केलेल्या तपासात त्यांनी गुन्ह केल्याची कबूली दिली. टोळीचा मुख्य सूत्रधार करण पठारे आहे. तो शिरुर परिसरातच रहाणारा असून त्याचा साखर खरेदी-विक्रीचा व्यवसाय आहे. यामध्ये त्याला सात ते आठ लाखाचे नुकसान झाले होते. यातूनच त्याने हे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

ही कारवाई पोलीस अधिक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अविनाश शिळीमकर, सहायक पोलीस निरीक्षक सचिन काळे, उपनिरीक्षक गणेश जगदाळे, अमित सिद -पाटील, कर्मचारी तुषार पंदारे, राजु मोमीन, योगेश नागरगोजे, मुकूंद कदम यांच्यासह पथकाने केली.

”महामार्गावरील पेट्रोलपंपावरील कामगारांना हत्याराच्या धाकाने धमकावून दरोडा टाकणार्‍या टोळीला अटक केली आहे. त्यांच्या साथीदारांचा शोध घेण्यात येत आहे.”

– अंकित गोयल, पोलीस अधिक्षक, पुणे ग्रामिण