पुणे-सातारा महामार्गाची दुरुस्ती करावी, वाहनधारकांची मागणी

431

सांगली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्ह्यातील वाहनचालकांना पुणे-बेंगलोर महामार्गावरून प्रवास करत असताना सातारा जिल्ह्यातील तासवडे हा शेवटचा टोलनाका लागतो. त्यातच या शहरातील सबंधित बँकेतही फास्टॅग मिळत नाहीत. त्यामुळे सागंली, कोल्हापूर आणि रत्नागिरी जिल्हातील वाहन चालकांची तासवडे टोलनाक्यावर फास्टॅग बसवण्यासाठी मोठी गर्दी होती. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून फास्टॅग बसविण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

महामार्गावरील टोलनाक्यावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. एक डिसेंबरपासून फास्टॅग व्दारेच टोल घेण्यात येणार होता. परंतु वाहनचालकांची फास्टॅगसाठी वाढलेली प्रचंड मागणी आणि त्यातच फास्टॅगची कमतरता यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून फास्टॅग बसविण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे. पुणे ते सातारा या महामार्गावरील रस्ता अत्यंत खराब झाला असून टोल बंद करावा अशी मागणी होत असताना या नवीन निर्णयामुळे विनातक्रार सर्वांना टोल भरावाच लागेल.वाहनधारकांना टोल देण्यासंबंधाने कोणतीही तक्रार नाही, मात्र त्या प्रमाणात सुविधा द्याव्यात या मागणीकडे मात्र राष्ट्रीय महामार्गात प्राधिकरण दुर्लक्ष करीत आहे.

महामार्गावरील टोलनाक्यावर वाहन चालकांचा वेळ आणि इंधन वाया जात होते. तसेच टोल कर्मचारी आणि वाहन चालक यांच्यामध्ये टोल देण्या-घेण्यावरून वादावादीचे प्रकार घडत होते. यावर उपाय म्हणून राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने वाहनांवरती फास्टॅग बसवण्याचा निर्णय घेतला होता. त्यामुळे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने देशातील सर्वच वाहन चालकांना आपल्या वाहनावर फास्टॅग बसवून घ्यावा असे आवाहन केले होते. त्यानुसार महामार्ग प्राधिकरणाकडून संपूर्ण देशभरातील महामार्गावरील टोल नाक्यावर फास्टॅग अनिवार्य करण्यात आले आहे. फास्टॅगद्वारेच टोल घेण्याची प्रक्रिया राबवण्यात येणार होती. फास्टॅग नसेल तर सदर वाहन चालकांना दुप्पट टोल द्यावा लागणार होता. फास्टॅगसाठी महामार्ग प्राधिकरणाकडून महामार्गावर संबंधित टोलनाक्यावर आणि बँकेद्वारे फास्टॅग देण्याची प्रक्रिया राबविण्यात आली होती.

दरम्यान पुणे – बेंगलोर महामार्गावर खेड शिवापूर आणि आनेवाडी, तासवडे, किणी टोल नाक्यावर ही फास्टॅग वाहनावर बसवण्याची यंत्रणा कार्यरत करण्यात आली आहे. गेल्या पंधरा दिवसापासून फास्टॅग बसवण्यासाठी वाहन चालकांना आवाहन करण्यात येत होते. दरम्यान वाहन चालकांकडून अचानक फास्टॅगसाठी मागणी प्रचंड प्रमाणात वाढली. त्यामुळे बँकेसह टोल नाक्यावर सुद्धा फास्टॅग उपलब्ध होत नव्हते. परिणामी सर्वत्र गोंधळाची परिस्थिती निर्माण झाली होती. त्यातच पुणे ते कोल्हापूर मार्गावर प्रवास करणार्‍या वाहन चालकांना खेड शिवापूर आणि आनेवाडी टोलनाक्यावर कर्मचार्‍यांकडून तासवडे टोलनाक्यावर तुम्हाला फास्टॅग मिळेल असे सांगण्यात येत होते. त्यामुळे तासवडे याठिकाणी वाहन चालक आणि कर्मचारी यांच्यामध्ये गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून फास्टॅग बसवण्याची मुदत 15 डिसेंबरपर्यंत वाढवण्यात आली आहे.

आपली प्रतिक्रिया द्या