
सामना प्रतिनिधी । पुणे
पुणे-सातारा राष्ट्रीय महामार्गाचे केवळ १२ किलोमीटर रुंदीकरणाचे काम बाकी आहे. त्यामुळे या मार्गावरील रखडलेली कामे येत्या ५ डिसेंबरपर्यंत पूर्ण केली जातील, अशी माहिती केंद्रीय वाहतूक आणि दळणवळनमंत्री नितीन गडकरी यांनी दिली. दरम्यान, पालकमंत्री गिरीश बापट यांना रखडलेले कामे पूर्ण करण्यासाठी सर्वाधिकार देण्यात आले आहेत. ते याबाबत सातत्याने पाठपुरावा करीत असल्याचेही त्यांनी सांगितले.
पुण्यात आयोजिक पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी पुणे-सातारा रस्त्याच्या कामाविषयी माहिती दिली. गडकरी म्हणाले, पुणे-सातारा महामार्ग रुंदीकरणाच्या कामाची किंमत १७२५ कोटी रुपये असून, लांबी १४०.३५ कि.मी. एवढी आहे. त्यातील १२८.३० कि.मी.चे सहापदरीकरण करायचे असून, या कामामधील १२ कि.मी. सोडल्यास उर्वरित काम पूर्ण झालेले आहे. या १२ कि.मी.मधील रस्तेजोडणी आणि बांधणीचे (स्ट्रक्चर) काम बाकी आहे. त्यामध्ये एवूâण ६२ स्ट्रक्चर असून, त्यातील ४७ पूर्ण झाली आहेत, तर चालू दहा स्ट्रक्चर ऑक्टोबरपर्यंत पूर्ण होतील. येत्या ५ डिसेंबरपर्यंत रुंदीकरणाची कामे पूर्ण केली जातील.
दरम्यान, राष्ट्रीय महामार्ग क्रमांक चारमधील पुणे-सातारा रस्त्याच्या कामासाठी भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण (नॅशनल हायवेज अॅथॉरिटी ऑफ इंडिया – एनएचएआय) आणि रिलायन्समध्ये झालेला करार काँग्रेस सरकारच्या काळातील आहे. हे काम आम्ही रिलायन्सला दिलेले नाही. या कामात असंख्य अडचणी आल्या असून, दिल्लीमध्ये मी स्वत: अनेक बैठका घेतल्या आहेत. पुण्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी सौरभ राव, सातारा प्रशासन यांनी प्रयत्न करून जवळपास सर्व भूसंपादन पूर्ण केले आहे, असेही गडकरी यांनी सांगितले.
माझे खाते टप्प्याटप्प्याने काम करीत नाही
पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाकडून (पुणे मेट्रोपोलिटन रिजन डेव्हलपमेंट ऑथॉरिटी – पीएमआरडीए) २३ हजार कोटी रुपयांचा वर्तुळाकार रस्ता (रिंगरोड) प्रस्तावित आहे. रस्ता उभारणीसाठी एनएचएआयला दहा हजार कोटी रुपये देऊ. तसेच या रस्त्याचे काम मार्गी लावण्यासाठी एनएचएआयऐवजी पीएमआरडीएला स्वतंत्र कंपनी म्हणून मान्यता दिली आहे. भूसंपादनासाठी राज्य शासनाने जमीन उपलब्ध करून दिल्यास तातडीने काम सुरू करू. टप्प्याटप्प्याने माझे खाते काम करीत नाही. भूसंपादन होण्याच्या आधी कामे सुरू केल्यास अनेक अडचणी येतात. त्यामुळे आधी भूसंपादन करून मग कामे करावीत. मात्र, टप्प्याटप्प्याने काम करण्याची पालकमंत्री बापट यांची इच्छा असल्यास माझी हरकत नाही. जमीन उपलब्ध करून दिल्यास दीड वर्षात रिंगरोड पूर्ण करू, असेही नितीन गडकरी यांनी स्पष्ट केले.
चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आदेश आजच
चांदणी चौकातील उड्डाणपुलासाठी चौदा हेक्टर जागेपैकी साडेपाच हेक्टर जागा पुणे महापालिकेने संपादित केली आहे. उर्वरित साडेआठ हेक्टर संरक्षण विभागाची जागा ताब्यात घेण्याचे बाकी असून, आयुक्त आणि पालिकेने यात लक्ष घालून जागा संपादित करावी. ८० टक्के भूसंपादन झाल्याशिवाय काम सुरू करायचे नाही, असा नियम माझ्या खात्यामध्ये केला आहे. मात्र, चांदणी चौकातील उड्डाणपुलाच्या कामाचा आदेश आजच ठेकेदाराला देण्यात येईल, अशी माहिती गडकरी यांनी दिली.































































