
पुणे शहरात दुचाकीस्वार सोनसाळखी चोरट्यांनी पुन्हा एकदा धुडगूस घालण्यास सुरूवात केली आहे. एकाच रात्रीत तीन ठिकाणी महिलांचे दागिने हिसकावून नेत चोरट्यांनी पोलिसांना आव्हान दिले आहे. दुचाकी वरून आलेल्या चोरट्यांनी महिलांचा पाठलाग करून त्यांच्या गळ्यातील दागिने हिसकावून नेल्याच्या घटना धायरी, आनंदनगर आणि वडगाव शेरी परिसरात घडल्या आहेत. या चोरट्यांनी पावणेतीन लाखांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी सिंहगड आणि चंदननगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महिला मे रोजी रात्री साडेनउच्या सुमारास दुचाकीवर दळण घेउन घरी निघाल्या होत्या. त्यावेळी बॉम्बे सॅपर्स परिसरातील रस्त्यावर चोरट्यांनी त्यांना अडवून गळ्यातील 40 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. महिलेने आरडाओरड करेपर्यंत दोन्ही चोरटे दुचाकीवरून पसार झाले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दिलीप पालवे तपास करीत आहेत.
चोरट्यांनी धायरी परिसरात भावजयसोबत दुचाकीवरून घरी चाललेल्या महिलेचा पाठलाग केला. सिग्नलवर गाडी थांबविल्याची संधी साधून चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील 1 लाख 93 हजारांचे सोन्याचे गंठण हिसका मारून चोरून नेले. ही घटना 27 मे रोजी रात्री दहा ते सव्वा दहाच्या सुमारास घडली. त्यानंतर चोरट्यांनी पुन्हा काही अंतरावर सनसीटी आनंदनगर परिसरातील महिलेला लक्ष्य करून 40 हजारांचे मंगळसूत्र हिसकावून नेले. चोरट्यांनी दोघींचे मिळून 2 लाख 33 हजारांचे दागिने चोरून नेले. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक दीपक खेडकर तपास करीत आहेत.
महिलांमध्ये भीतीचे वातावरण
सिंहगड परिसरात मागील काही दिवसांपासून चोरटे महिलांना लक्ष्य करत आहेत. त्यामुळे रात्री घराबाहेर पडणाऱ्या महिलांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पुण्यात निमर्नुष्य ठिकाणांसह सिग्नलवर महिलांचे दागिने हिसकाविण्याच्या घटनांमुळे चिंता व्यक्त केली जात आहे. पोलिसांनी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.






























































