
पुणे येथील विषारी दारूकांडात 19 जणांचे बळी गेल्यानंतर खडबडून जागे झालेल्या सरकारी यंत्रणांनी आता धाडसत्र सुरू केले आहे. अन्न व औषध प्रशासनाने भिवंडी तालुक्यातील वळ ग्रामपंचायत हद्दीतील म्हात्रे कंपाऊंडमधील रेक्स इंटरनॅशनल कंपनीच्या गोदामावर छापेमारी केली. या कारवाईत प्लॅस्टिक ड्रममध्ये साठवलेला 5 हजार 929 लिटर मिथेनॉलचा साठा जप्त करीत गोदाम सीलबंद केले. या मिथेनॉलचा वापर पुणे येथे विषारी दारू बनवण्यासाठी करण्यात आला होता.
पुणे आणि पिंपरी चिंचवडमध्ये गावठी दारू प्यायल्याने अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. अवघ्या 30 रुपयांत मिळणारी ही दारू पिण्यासाठी झुंबड उडाली होती. दारूत मिथेनॉल हे विषारी रसायन मिसळल्यामुळे हे मृत्यूतांडव घडल्याचे समोर येताच अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मिथेनॉलचा बेकायदा साठा करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश दिले होते. दारूत मिसळलेल्या मिथेनॉलचा पुरवठा रेक्स इंटरनॅशनल यांच्याकडून झाल्याची माहिती मिळताच ठाण्याचे औषध निरीक्षक योगेंद्र पोळ यांनी रेक्स इंटरनॅशनलच्या भिवंडीच्या अंजूर गावातील म्हात्रे कंपाऊंडमध्ये असलेल्या गोदामावर छापा मारला.
मिथेनॉलची कुठेही नोंदच नव्हती
गोदामात 5 हजार 929 लिटर इतका साठा असतानाही कंपनीमध्ये कुठेही या विषारी द्रव्याची कोणतीही नोंद नव्हती. इतकेच नव्हे तर साठे नोंदवहीतही त्याचा कोणताही उल्लेख केलेला नव्हता. मिथेनॉलच्या खरेदी-विक्रीचा कोणताही तपशील उपलब्ध नव्हता. कंपनीचे मालक अरुणकुमार चौबे आणि अभिषेक चौबे यांच्याविरुद्ध नारपोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. त्यांना राज्य उत्पादन शुल्क विभागाने ताब्यात घेतले असून त्यांची कसून चौकशी सुरू आहे.
पुण्यासारखी भयंकर दुर्घटना टळली
अन्न व औषध प्रशासन विभागाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वेळीच समयसूचकता दाखवत रेक्स इंटरनॅशनलच्या गोदामावर छापा मारण्याचे आदेश दिल्याने पुढील अनर्थ टळला, अन्यथा पुण्यासारखे आणखी एक भयंकर दारूकांड घडण्याची भीती होती. या कारवाईने दारू विव्रेते व मिथेनॉलचा साठा करणाऱ्या कंपन्यांतील साटेलोटय़ाचे पितळ उघडे पडले आहे.
दारूकांडातील बळींची संख्या 19 वर
पिंपरी-चिंचवडमधील फुगेवाडीतील आणखी एकाचा विषारी दारूमुळे शनिवारी मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची संख्या 19 वर पोहोचली आहे. विविध रुग्णालयांत नऊ जण दाखल असून, एकाची प्रकृती चिंताजनक आहे. राजेंद्र सृजन टम्पो (वय 36, रा. फुगेवाडी) यांचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी दापोडी पोलिसांनी सहा जणांना अटक केली असून ते कोठडीत आहेत. दरम्यान, याप्रकरणी पोलीस आणि उत्पादन शुल्क खात्यातील एकूण 22 जणांना निलंबित केले आहे.






























































