कवठे येमाईत तलाठीच येत नसल्याने ग्रामस्थ संतप्त

492

सामना प्रतिनिधी। कवठे येमाई

शिरूर तालुक्याच्या पश्चिम भागातील 12 वाड्या वस्त्यांचा समावेश असलेल्या व लोकसंख्येच्या दृष्टीने मोठ्या असलेल्या कवठे येमाईत तलाठीच येत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संतापाचा वातावरण निर्माण झाले आहे. तलाठीच येत नसल्याने त्यांचे कार्यालयही बंदच राहात असल्याने याठिकाणी कायमस्वरूपी व नियमित कार्यालयात उपस्थित राहणाऱ्या तलाठ्याची नियुक्ती करावी अशी आग्रही मागणी सरपंच अरुण मुंजाळ,सामाजिक कार्यकर्ते अनिल रायकर व संतप्त ग्रामस्थांनी केली आहे.

ग्रामस्थांनी तलाठी गावातच येत नसल्याने त्यांच्या सह्यांसाठी प्रतीक्षेत असणा-या कागदपत्रांचा गठ्ठाच दाखवला. यात जिल्हा परिषदेच्या शारदा माता भगिनी योजनेत विधवा शेतकरी महिलांना तलाठी 7/12,8 अ चा उतारा जोडणे आवश्यक असताना गेल्या १५ दिवसांपासून तलाठीच गावात येत नसल्याने त्यांना या योजनेचा लाभ मिळेल का ? व इतर ही स्थानिक महसुली संदर्भातील कामांकरिता शेतकरी व नागरिकांना होत असलेला मनस्ताप थांबेल का ? अशी संतप्त प्रतिक्रिया शेतकरी, महिला व ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे. या बाबत शिरूरचे तहसीलदार गुरु बिराजदार यांच्याशी सातत्याने संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.

आपली प्रतिक्रिया द्या