पुणे – तरूणावर खूनी हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न, आंदेकर टोळीच्या म्होरक्याला अटक

टोळीचे वर्चस्व कमी होण्यास कारणीभूत असल्याच्या रागातून तरुणावर कोयत्याने हल्ला करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सूर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह दोघांना खडक पोलिसांनी अटक केली आहे. याप्रकरणी परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

सूर्यकांत उर्फ बंडू राणोजी आदेकर (वय 60), ऋषभ आंदेकर (वय 21) या दोघांना अटक केली आहे. इतर 5 ते 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत ओंकार कुडले (वय 21) यांनी खडक पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्याशिवाय 16 वर्षीय मुलाने समर्थ पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून कानिफनाथ महापूरे याच्यासह 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आंदेकर टोळीचे वर्चस्व कमी होण्यास फिर्यादी ओंकार आणि त्याचा मित्र सूरज ठोंबरे कारणीभूत असल्याचा राग टोळीला होता. रागातून म्होरक्या बंडू आंदेकर याच्या सांगण्यावरून इतर आरोपींनी 21 फेब्रुवारीला ओंकारवर पालघन व कोयत्याने हल्ला करून ठार मारण्याचा प्रयत्न केला.

तर 16 वर्षीय मुलाने समर्थ पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार सहा जणांविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी 23 फेब्रुवारीला रात्री दहाच्या सुमारास त्यांच्या मित्रासह नाना पेठेतील घराजवळ थांबले होते. त्यावेळी हातात कोयते घेउन दुचाकीवर आलेल्या आरोपींनी फिर्यादीला शिवीगाळ केली. सूरज ठोंबरेच्या बातम्या हाच आंदेकर टोळीला देतो, आणि लावालाव्या करतो, असे म्हणत भाऊंनी यालाच संपावयला सांगितले आहे असे म्हणून त्याच्यावर हल्ला करून जखमी केले. परिसरात गोंधळ घालून दहशत निर्माण केली असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे.

तरूणावर खूनी हल्ल्या प्रकरणी आंदेकर टोळीचा म्होरक्या सुर्यकांत उर्फ बंडू आंदेकरसह दोघांना अटक केली असून, इतरांचा शोध सुरू आहे. – हर्षवर्धन गाडे, पोलीस निरीक्षक, खडक पोलीस ठाणे

आपली प्रतिक्रिया द्या