पंजाब – 7 पैकी 6 नगर परिषदा जिंकत काँग्रेसची मुसंडी, भाजपला मोठा धक्का

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पंजाबमध्ये निवडणुकांचे निकाल आज जाहीर होत आहेत. एकूण 117 जागांवर 9 हजारांहून अधिक उमेदवारांचे भविष्य ठरणार आहे. शेतकरी आंदोलन तापलेले असतानाच या निवडणुका होत असल्याने निकालांवर साऱ्यांचेच लक्ष्य लागले आहे.

केंद्राच्या कृषी कायद्यांविरोधात दिल्लीच्या सीमांवर शेतकऱ्यांचे आंदोलन, पंजाब आणि हरियाणाच्या शेतकऱ्यांचा सक्रीय सहभाग, अशातच पंजाबमधील निवडणुका यामुळे आज लागणारे निकाल महत्त्वाचे ठरत आहेत. रविवारी 14 फेब्रुवारी रोजी एकूण 117 नगर पालिका, परिषदांच्या क्षेत्रांमध्ये निवडणुकांसाठी मतदान घेण्यात आले. 109 नगर पालिका परिषद, नगर पंचायती यांचा समावेश आहे. तर 8 नगर परिषदांचा समावेश आहे.

7 नगर परिषदांपैकी 6 नगर परिषदा जिंकून काँग्रेसने भाजपला मोठा धक्का दिला आहे. मोगा, होशियारपुर, अबोहर, भठिंडा, पठाणकोट आणि कपूरथला परिषद जिंकली आहे आणि बटाला येथे काँग्रेस आघाडीवर आहे.

ज्या नगर परिषदांमध्ये मतदान घेण्यात आले त्या मध्ये अबोहर, भठिंडा, बाटला, कपूरथला, मोहाली, होशियारपुर, पठाणकोट आणि मोगा यांचाही समावेश आहे.

राजकीय पक्षांचा विचार केल्यास इथे काँग्रेसचे 2037, अकाली दलाचे 1569, भाजपचे 1003 आणि आमआदमी पक्षाचे 1006 उमेदवार निवडणुका लढत आहेत. पंजाबमध्ये सकाळी 9 पासून मतमोजणी सुरू झाली.

मतमोजणीच्या पहिल्या टप्प्यात काँग्रेसला मोठी आघाडी

मतमोजणीला सुरुवात झाल्यावर बहुतांश ठिकाणी पहिल्या काही फेऱ्यांमध्ये काँग्रेसचे उमेदवार पुढे असल्याचे चित्र दिसत आहे. अकाली दल आणि ‘आप’ही पाठोपाठ असल्याचे दिसत आहे. पंजाबच्या सुल्तानपुर भागात मतमोजणी सुरू असून 7 पैकी 5 ठिकाणी काँग्रेस तर 2 जागांवर अकाली दल पुढे आहे.

अमृतसरमध्ये अकाली दलाचा दबदबा

अमृतसर जिल्ह्यातील अजनाला येथे अकाली दल पुढे आहे. एकूण 15 वॉर्ड पैकी 8 वर अकाली तर 7 वर काँग्रेस उमेदवार पुढे आहे. मजीठा येथे अकाली दलाचे 10, तर काँग्रेसचे 2 आणि एक अपक्ष जिंकून आले आहेत.

फजलिकामध्ये काँग्रेसला 11, अकाली दलाला 5 आणि आपला 1 वार्ड मध्ये विजय मिळाला आहे. भठिंडामध्ये 2 वार्डात अकाली दल आणि 4 वार्डात काँग्रेस उमेदवार विजयी झाले आहेत.