एसआयटीकडून अक्षय कुमारला समन्स

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन। नवी दिल्ली

शीख धर्मियांचा पवित्र धर्मग्रंथ असलेल्या गुरू ग्रंथसाहेबचा अपमान केल्याप्रकरणी बॉलीवूड अभिनेता अक्षय कुमार याला पंजाब पोलिसांच्या विशेष तपास पथकाने समन्स पाठवले आहे. अक्षय कुमारबरोबरच पंजाबचे माजी मुख्यमंत्री प्रकाश सिंह बादल आणि माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांनाही समन्स पाठवण्यात आले आहे. पंजाब सरकारने ट्विटरवरून ही माहिती दिली आहे.

पोलीस फायरिंगच्या घटनांची तपासणी करणाऱ्या विशेष तपास पथकाने बरगाडी गावात धर्मग्रंथाचा अपमान केल्याप्रकरणी प्रकाश, सुखबीर बादल यांच्यासह अक्षय कुमारला समन्स पाठवले आहे. प्रकाश यांना एसआयटीसमोर 16 नोव्हेंबर, सुखबीर यांना 19 नोव्हेंबर आणि अक्षयला 21 नोव्हेंबरला अमृतसरयेथील सर्किट हाऊसमध्ये हजर राहावे लागणार आहे. असे या ट्वीटमध्ये पंजाब सरकारने म्हटले आहे.

या तिघांना एसआयटीचे सदस्य आणि आयजी रँकचे अधिकारी कुँवर विजय प्रताप सिंह यांनी वेगवेगळे समन जारी केले आहे.

पवित्र ग्रंथाचा अपमान झाल्याचे सर्वप्रथम 2015 साली समोर आले होते. फरीदकोट जिल्हयातील बुर्ज जवाहर सिंहवाला गावात ही घटना घडली होती. त्यानंतर 12 ऑक्टोबर रोजी बरगाडी गावात गुरू ग्रंथ साहेबच्या 110 पानांबरोबर छेडछाड करण्यात आली. त्यानंतर पंजाबमधील इतर राज्यांमध्येही अशाच घटना घडल्या होत्या. त्यानंतर सगळा शीख समाजच रस्त्यावर उतरला होता. ज्यांनी गुरू ग्रंथ साहेबचा अपमान केला त्यांच्यावर कडक कारवाई करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी केली होती. यावेळी जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांनी केलेल्या फायरिंगमध्ये दोन नागरिकांचा मृत्यू झाला होता. कोटकपूरा येथेही पोलिसांनी आंदोलनकर्त्यांवर गोळीबार केला होता. त्यानंतर मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी याप्रकरणी एक तपास आयोग नेमला होता. यावेळी तपासात या सर्वप्रकरणाचे धागेदोरे डेरा सच्चा सौदाचा प्रमुख गुरमीत राम रहीम याच्याशी जोडल्याचे समोर आले होते. त्यानंतर अक्षय कुमारनेच बादल यांची राम रहीमबरोबर भेट घडवून आणली होती असा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला. पण अक्षयने मात्र सर्व आरोप फेटाळले होते व आपण कधीही राम रहीमला भेटलो नाही असा दावा केला होता. पण गेल्यावर्षी जानेवारी महिन्यात अक्षयची पत्नी ट्विंकल हीने सोशल मीडियावर राम रहीमचा फोटो पोस्ट केला होता व तो आमच्या शेजारी राहायला आल्याचे ट्वीट केले होते.